अल कायदाचा सध्याचा प्रमुख जवाहिरी अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमाभागात दडून बसला आहे – संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालातील दावा

संयुक्त राष्ट्रसंघ – अमेरिकेने पाकिस्तानात घुसून अ‍ॅबोटाबाद येथे दडून बसलेला अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला ठार केले. अमेरिकेच्या या ‘ऑपरेशन जेरोनिमो’ला दहा वर्षे पूर्ण झाली. पण लादेन आपल्या देशात कसा काय आला, याचे उत्तर पाकिस्तान अजूनही देऊ शकलेला नाही. लादेनच्या नंतर अल कायदाचा सर्वोच्च नेता असलेला आयमन अल जवाहिरी देखील अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरच दबा धरून बसला आहे, असा संशय संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केला. त्यामुळे पाकिस्तान हे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचे माहेरघर असल्याचे पुन्हा एकदा समोर येत आहे.

अफगाणिस्तान-पाकिस्तानअमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीची तयारी सुरू केली आहे. याबाबत कतारच्या दोहा येथे अमेरिका व तालिबानमध्ये झालेल्या करारात तालिबानने आपण अल कायदाशी संबंध ठेवणार नाही, असे कबुल केले होते. पण अजूनही तालिबानचे अल कायदाशी संबंध आहेत, असा ठपका संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालाने ठेवला. अल कायदा व इतर दहशतवादी संघटनांचे नेते अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या सीमाभागात आहेत, असे हा अहवाल सांगतो. अल कायदाचे प्रमुख नेते तर या भागातच दबा धरून बसलेले असून यात अल कायदाप्रमुख आयमन अल जवाहिरी याचाही समावेश असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

जवाहिरी अजूनही जिवंत आहे, पण तो अल कायदाचे नेतृत्त्व करण्याच्या स्थितीत नाही. त्याच्यासह अल कायदाचे सुमारे पाचशे दहशतवादी अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या सीमाभागात दबा धरून बसलेले आहेत, अशी माहिती सदर अहवालात नोंदविण्यात आलेली आहे. अफगाणिस्तान पाकिस्तानच्या सीमेवर हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांचे नियंत्रण आहे. हक्कानी नेटवर्क हा तालिबानमधलाच प्रभावशाली गट असून तो पाकिस्तानच्या इशार्‍याने काम करतो. या गटाच्या दहशतवाद्यांचा वापर करून पाकिस्तान अफगाणिस्तानात आपले हेतू साध्य करण्यासाठी धडपडत आहे. पण आता आयमन अल जवाहिरी देखील याच भागात असल्याची माहिती समोर आल्याने पाकिस्तानसमोरील अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.

अफगाणिस्तान-पाकिस्तानजागतिक दहशतवादाचे केंद्र म्हणून पाकिस्तान कुख्यात आहे. आपला देश दहशतवादी नसून दहशतवादाचा बळी आहे, हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तान धडपडत आहे. त्याचवेळी दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची जबाबदारी पार पडण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून केले जात असल्याची ग्वाही या देशाचे सरकार देत आहे. पण अजूनही राजकीय हेतू साधण्यासाठी पाकिस्तान दहशतवादाचा वापर करीत असल्याचे सिद्ध झाले होते. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानने या प्रश्‍नावर पाकिस्तानची कडक शब्दात निर्भत्सना केली होती.

अशा परिस्थितीत जवाहिरीचे अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या सीमेवर वास्तव्य असल्याची माहिती समोर आली आहे. पुढच्या काळात ही या भागातील जवाहिरीचे वास्तव्य व त्याला पाकिस्तानकडून सहाय्य मिळत असल्याची बाब सिद्ध झाली, तर पुन्हा एकदा पाकिस्तान दहशतवादी देश असल्याच्या आरोपाला दुजोरा मिळेल. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाचा हा अहवाल पाकिस्तानच्या चिंता वाढविणारा ठरतो.

leave a reply