अल कायदा अफगाणिस्तानात पुन्हा संघटित होऊ शकते

- अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन

कुवेत सिटी/काबुल – दोन दशकांपूर्वी अमेरिकेवर दहशतवादी हल्ला चढविणारी ‘अल कायदा’ ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात पुन्हा डोके वर काढू शकते, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानात अल कायदा पुन्हा संघटित होणे धोकादायक असून, अल कायदाला रोखण्यासाठी अमेरिका सज्ज असल्याचा दावाही त्यांनी केला. गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सैन्यमाघारीचे समर्थन करताना, अफगाणिस्तानातील अल कायदा संपल्याचे वक्तव्य केले होते. मात्र आता बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीच अल कायदा पुन्हा अफगाणिस्तानात सक्रिय होण्याचे इशारे देत आहेत. यातून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना अफगाणिस्तानमधील वास्तवाची जाणीव नसल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.

‘अफगाणिस्तानात अल कायदा पुन्हा संघटित होते की नाही याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. अल कायदा व आयएस या दोन्ही दहशतवादी संघटनांकडे संधी मिळाल्यास पुन्हा संघटित होण्याची क्षमता आहे. अफगाणिस्तान, असो अथवा कोणत्याही अनियंत्रित प्रदेशात डोके वर काढण्याची क्षमता अल कायदाकडे आहे’, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी बजावले. यापूर्वी तालिबानने ‘अल कायदा’ला आश्रय दिला होता, मा यावेळी तसेच होऊ नये म्हणून तालिबानला नोटिस देण्यात आल्याचा दावाही ऑस्टिन यांनी केला. त्याचवेळी अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सुरक्षेला कोणताही धोका उत्पन्न झाला तर तो रोखण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचेही संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

‘टेहळणी व पर्शियन आखातासह इतर तळांवर तैनात असणार्‍या लढाऊ विमानांच्या सहाय्याने अफगाणिस्तानातील अल कायदा व इतर दहशतवादी संघटनेचा मुकाबला केला जाईल’, असे अमेरिकी संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी अफगाणिस्तानात अमेरिकेचे जवान व गुप्तचर यंत्रणा नसल्याने अशा प्रकारच्या मोहिमा अधिक कठीण असतील, याची कबुलीही त्यांनी दिली. गेल्या वर्षी तालिबानबरोबर केलेल्या करारात अमेरिकेने तालिबान अफगाणिस्तानात कोणत्याही दहशतवादी संघटनेला थारा देणार नाही, अशी अट घातली आहे. मात्र करारात अट असली तरी तालिबानचे अल कायदाबरोबरील संबंध कायम असल्याचे अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी सातत्याने बजावत आहेत.

अमेरिकेच्या अफगाणिस्तानमधील माघारीपूर्वीही संरक्षणमंत्री ऑस्टिन तसेच वरिष्ठ लष्करी अधिकारी जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी अल कायदाबाबत इशारे दिले होते. संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी संसदेसमोर झालेल्या सुनावणीत, अमेरिकेच्या माघारीनंतर दोन वर्षात अल कायदा अफगाणिस्तानात संघटित होईल, असे म्हटले होते. तर जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी, सैन्यमाघारीनंतर अमेरिकेला अल कायदापासून असलेला धोका अधिक वाढेल असे बजावले होते.

अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री तसेच गुप्तचर यंत्रणा सीआयएचे माजी प्रमुख लिऑन पॅनेटा यांनीही अल कायदा व आयएस या दोन्ही दहशतवादी संघटनांचा धोका अधोरेखित केला होता. मात्र आजीमाजी अधिकारी व सल्लागारांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी घाईघाईत अमेरिकेचे अफगाणिस्तानातील सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला होता.

आपल्या निर्णयाचे समर्थन करताना बायडेन यांनी, अल कायदा व ओसामा बिन लादेनला संपविणे हे अमेरिकेच्या अफगाण मोहिमेचे उद्दिष्ट होते आणि ते तर पूर्ण झाले आहे, असा दावा केला होता. अफगाणिस्तानातून अल कायदा संपल्यानंतर त्या देशात सैन्य ठेवण्याची गरज नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले होते. मात्र बायडेन यांच्या वक्तव्यानंतर काही तासातच अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी अल कायदा अफगाणिस्तानात सक्रिय असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना तोंडघशी पाडले होते.

leave a reply