येमेनमधील अल कायदाचा नेता अटकेत

- संयुक्त राष्ट्रसंघाची माहिती

वॉशिंग्टन – ‘अल कायदा इन अरेबियन पेनिन्स्युला’ या येमेनमधील अल कायदासंलग्न संघटनेचा नेता ‘खालिद बतार्फी’ हा अटकेत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून खालिद सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या अहवालातून दिली. येेमेनमधील अल कायदाच्या नेत्याला झालेली अटक सर्वात मोठे यश मानले जाते. कारण त्याच्या अटकेमुळे अल कायदा व इतर दहशतवादी संघटनांच्या नेटवर्कचा पर्दाफाश होईल, असा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाने दोन दिवसांपूर्वी येमेनसंबंधी अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात येमेनमधील अल कायदासंगग्न संघटनेविरोधात काही महिन्यांपूर्वी मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत खालिद याला अटक करण्यात यश मिळाले. तर खालिदचा उत्तराधिकारी असलेला साद अतेफ अल-अवलाकी हा सुरक्षा यंत्रणेच्या कारवाईत मारला गेला. येमेनच्या अल-महराह प्रांतातील घायदा शहरात ही कारवाई करण्यात आली होती.

खालिदला कुठे कैद केले आहे किंवा येमेनी लष्कराने ही कारवाई केली किंवा अन्य देशाच्या किंवा संघटनेच्या लष्कराने ही कारवाई पार पाडली, या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे समोर आलेली नाहीत. पण अल कायदा व संलग्न दहशतवादी संघटनांच्या ऑनलाईन हालचालींवर नजर ठेवणाऱ्या ‘साईट इंटेलिजन्स ग्रूप’ने यासंबंधी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ही कारवाई करण्यात आली होती. येमेनच्या लष्कराने खालिद व अल कायदाच्या इतर दहशतवाद्यांवर कारवाई केली. या कारवाईत खालिदला ताब्यात घेऊन येमेनी सुरक्षा यंत्रणांनी त्याला सौदी अरेबियाच्या हवाली केले होते.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने 2018 साली खालिदला येमेनमधील अल कायदाचा सर्वात मोठा दहशतवादी ठरवून त्याच्यावर ईनाम जाहीर केले होते. 9/11च्या हल्ल्याआधी खालिद याने अफगाणिस्तानात प्रशिक्षण घेतले होते. पुढच्या काळात अमेरिकेने अफगाणिस्तानात हल्ले चढविल्यानंतर खालिदने अल कायदाच्या इतर दहशतवाद्यांप्रमाणे येमेनमध्ये पळ काढून संलग्न संघटना उभारली होती.

अशा परिस्थितीत, खालिदला झालेली अटक हे सर्वात मोठे यश मानले जाते. खालिदच्या अटकेमुळे अल कायदा व या संघटनेशी जोडलेल्या इतर दहशतवादी संघटना आणि त्यांच्या समर्थकांचा उलगडा होऊ शकतो, असा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत.

leave a reply