अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील माघारीनंतर अल कायदा दोन वर्षात संघटीत होईल

- अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन

• · तालिबानच्या हल्ल्यांमध्ये २३ अफगाण कमांडो ठार
• · नाटोच्या अधिकार्‍यांची युएई, कतारबरोबर चर्चा
• · कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने दूतावास बंद केला

काबुल/वॉशिंग्टन – अमेरिकेची अफगाणिस्तानातील सैन्यमाघार पूर्ण झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षात अल कायदा पुन्हा संघटित होईल, असा इशारा अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिला. असाच इशारा देऊन अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉंडोलिझा राईस व हिलरी क्लिंटन आणि माजी संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांनी अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेण्याच्या बायडेन प्रशासनाच्या निर्णयावर ताशेरे ओढले होते.

अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील माघारीनंतर अल कायदा दोन वर्षात संघटीत होईलअफगाणिस्तानातील तालिबानचे हल्ले अधिकच तीव्र झाले आहेत. एकाच हल्ल्यात तालिबानने अफगाणी लष्कराच्या कमांडो पथकाचे २३ जवान ठार केले. अफगाणिस्तानातील सुमारे २०० ठिकाणी लष्कर आणि तालिबान यांच्यात संघर्ष पेटला आहे. तालिबान लवकरच अफगाणिस्तानचा ताबा घेण्याची शक्यता यामुळे अधिकच बळावली आहे. असा परिस्थितीत संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीसाठी घाई केल्याची टीका अमेरिकेत जोर पकडत आहे. अमेरिकेच्या सिनेटमध्ये बायडेन प्रशासनाला अफगाण सैन्यमाघारीवर प्रश्‍नाला सामोरे जावे लागत आहे.

अमेरिकन सिनेटच्या ‘ऍप्रोप्रिएशन्स कमिटी’चे सदस्य लिंडसे ग्रॅहम यांनी सैन्यमाघारीबाबत संरक्षणमंत्री ऑस्टिन आणि अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांना कठोर प्रश्‍न विचारले. अफगाणिस्तानातून संपूर्ण माघार घेतल्यानंतर, अल कायदा आणि आयएस पुन्हा संघटित होण्याची किती शक्यता आहे, असा सवाल ग्रॅहम यांनी केला.

सैन्यमाघारीच्या दोन वर्षानंतर अल कायदा अफगाणिस्तानात पुन्हा संघटित होईल, असे संरक्षणमंत्री ऑस्टिन म्हणाले. तर अफगाणिस्तानातील सरकार कोसळले किंवा अफगाण लष्कर विसर्जित झाले तर अल कायदापासून असलेला धोका अधिक वाढेल, असा इशारा अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी दिला.

अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील माघारीनंतर अल कायदा दोन वर्षात संघटीत होईल - अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिनगेल्या काही दिवसांमधील तालिबानचे अफगाण जवानांवरील हल्ले तीव्र झाले आहेत. अफगाणिस्तानच्या फरयाब प्रांतातील दवलात अबाद जिल्ह्यात लष्कराने छेडलेल्या तालिबानविरोधी मोहिमेत २९ जणांचा बळी गेला. यामध्ये अफगाण कमांडो फोर्सेसच्या २३ तर पोलिसांच्या सहा जवानांचा समावेश आहे. अफगाण लष्करासाठी हा मोठा हादरा असल्याचा दावा स्थानिक वृत्तसंस्थेने केला. यानंतर अफगाण लष्कराला दवलात अबाद भागातून माघार घ्यावी लागली.

गुरुवारी रात्री अफगाण लष्कराने राजधानी काबुलजवळील वारदाक प्रांतात केलेल्या कारवाईत १० तालिबानींना ठार केले. गेल्या चोवीस तासात दीडशेहून अधिक तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा अफगाण संरक्षण मंत्रालय करीत आहे. देशातील सुमारे २०० ठिकाणी लष्कर आणि तालिबानमध्ये संघर्ष सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये तालिबानच्या हल्ल्यांमुळे अफगाणी लष्कराची पिछेहाट होत असून मोठे प्रांत तालिबानच्या हाती सापडत असल्याचा दावा केला जातो.

तालिबानच्या या वाढत्या हल्ल्यांमुळे अमेरिका व नाटो लष्कराला सहाय्य करणारे अफगाणी नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. अमेरिकेसाठी एजंट, दुभाषी, सहाय्यक किंवा कंत्राटदार म्हणून काम करणार्‍यांनी तालिबानच्या धास्तीने अमेरिकी दूतावासात व्हिसासाठी रांगा लावल्या आहेत. पण अमेरिकी दूतावासातील सुमारे ११४ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा बळी गेला आहे. यामुळे व्हिसासाठी अर्ज करणार्‍यांची मुलाखत पुढे ढकलल्याचे दूतावासाने जाहीर केले. यामुळे अफगाणींची मोठी कोंडी झाल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, अफगाणिस्तानातील नाटोचे प्रमुख जनरल स्कॉट मिलर यांनी युएईचा दौरा करुन क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद यांची भेट घेतली. त्याच्या काही तासआधी नाटोने अफगाणी जवानांना प्रशिक्षण देण्याकरिता कतारकडे लष्करी तळाची विचारणा केल्याची बातमी आली होती. त्याला कतार तयार असल्याचेही वृत्त आले आहे. त्याचवेळी तुर्कीेने देखील अफगाणिस्तानातील मोहिमेसाठी अमेरिकेला तळ देण्याची तयारी दाखविल्याचे दावे केले जातात.

leave a reply