अफगाणिस्तानातील परिस्थितीला राष्ट्राध्यक्ष बायडेन जबाबदार असल्याच्या आरोपांची तीव्रता वाढली

वॉशिंग्टन – काबुलच्या विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या अमेरिकी जवानाच्या आईने बायडेन यांची कठोर शब्दात निर्भत्सना केली. स्मृतीभ्रंश झालेल्या बिनडोक नेत्यामुळे माझ्या मुलाचा बळी गेला, असे या शोकाकूल मातेने म्हटले आहे. तर अफगाणिस्तानातील अराजकाचे उत्तरदायित्त्व निश्‍चित करण्याची मागणी करणाऱ्या अमेरिकेन मरिनच्या जवानाला तडकाफडकी सेवेतून काढून टाकण्यात आले. माझ्या सहकाऱ्यांनी अफगाणिस्तानात दिलेले बलिदान व्यर्थ ठरले, अशी हताश प्रतिक्रिया या जवानाने नोंदविली होती.

चार दिवसांपूर्वी काबुल विमानतळाजवळील स्फोटात बळी गेलेल्या 13 जवानांना आदरांजली वाहण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन डोव्हर येथील हवाईदलाच्या विमानतळावर दाखल होणार आहेत. बायडेन या घातपातात बळी गेलेल्या अमेरिकी जवानांप्रती संवेदना व्यक्त करीत आहेत. मात्र अमेरिकी जनता या दहशतवादी हल्ल्याला बायडेन यांची धोरणेच जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया नोंदवित आहे.

अमेरिकी मरिन्सचा जवान लान्स कॉर्पोरल रायली मॅक्कॉलम याची माता कॅथी यांनी बायडेन यांच्यावर कठोर शब्दात ताशेरे ओढले. ‘अफगाणिस्तानातील अराजक टाळता आले असते. प्रत्येक नागरिक व जवानांच्या माघारीसाठी कितीतरी महिने हाती होते. पण बायडेन प्रशासनाने तसे केले नाही. त्याऐवजी त्यांनी माझ्या लेकासह सहा हजार जवानांना पाठविले’, अशी टीका कॅथी यांनी केली. ‘बायडेन हे बेजबाबदार, स्मृतीभ्रंश झालेले बिनडोक नेते असून त्यांना निवडून आणणारे देखील माझ्या मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत’, असा आरोप कॅथी यांनी केला.

तर काबुल स्फोटात बळी गेलेले लान्स कॉर्पोरल करीम निकोई यांचे वडिल स्टिव्ह यांनी देखील अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीच्या बायडेन यांच्या नियोजनावर संताप व्यक्त केला. ‘जुलै महिन्यात बागराम हवाईतळ अफगाणी लष्कराच्या ताब्यात देण्याऐवजी, तिथूनच माघार घेण्यास सुरुवात केली असती तर काबुल विमानतळावरील दहशतवादी हल्ला टाळता आला असता. पण दहशतवादी सहज लक्ष्य करतील, अशा काबुल विमानतळातूनच ही माघार घेण्याचे निश्‍चित करण्यात आले’, असे सांगून स्टिव्ह यांनी बायडेन यांच्या निर्णयावर शंका घेतल्याचे दिसत आहे.

दरम्यान, अमेरिकी लष्कराच्या मरिन्समध्ये सेवेत असणाऱ्या लेफ्टनंट कर्नल स्ट्युअर्ट शेलर या अधिकाऱ्याने काबुल विमानतळावरील हल्ल्याची वरिष्ठ नेते व अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली होती. तसेच ‘प्रत्येक पिढीला एका क्रांतीची आवश्‍यकता असते’ हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचे प्रसिद्ध विधानही लेफ्टनंट कर्नल शेलर यांनी वापरले. यानंतर अमेरिकेच्या लष्कराने शेलर यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ केले आहे.

leave a reply