अमेरिका, युरोपने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार रहावे

आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांचा इशारा

स्टॉकहोम – कोरोनाव्हायरसमुळे जगभरात गेल्या चोवीस तासात चार हजाराहून अधिक जणांचा बळी गेला. तर शनिवारी जगभरात सुमारे एक लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे. अमेरिका, युरोप, ब्राझील, रशिया, भारत या देशांमधील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब ठरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तर अमेरिका आणि युरोपने या साथीच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार रहावे, असा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत जगभरातील कोरोनाव्हायरसच्या बळींच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. गेल्या चोवीस तासात या साथीने जगभरात ४,१८३ जण दगावले असून जगभरातील या साथीच्या बळींची एकूण संख्या ३,४४,५५० वर गेली आहे. यामध्ये अमेरिकेतील १,१२७ साथीच्या बळींच्या समावेश आहे. अमेरिकेतील या साथीच्या एकूण बळींची संख्या एक लाखांच्या जवळ पोहोचत आहे. तर ब्राझीलमध्ये एका दिवसात ९६५, युरोपिय देशांमध्ये ८५६ जणांचा या साथीने मृत्यू झाल्याची माहिती, जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली.

तर वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात जगभरातील २१२ देशांमध्ये ९९,८७२ नव्या रुग्णांची नोंद झाली. याबरोबर जगभरात नव्या रुग्णांची संख्या ५४ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. यापैकी ७५ टक्के कोरोनाबाधित हे फक्त बारा देशांमध्ये आहेत. या बारा देशांमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४१ लाखांच्या घरात आहे. यामध्ये अमेरिका तसेच युरोपातील ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटलीसह रशिया, ब्राझील, भारत या देशांचा समावेश होतो.

अमेरिकेत चोवीस तासात २१,९२९, युरोपात १७,७३४, ब्राझीलमध्ये १६,५०८ आणि रशियामध्ये ८,५९९ नवे रुग्ण आढळले आहेत. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता ब्राझीलबरोबरची अमेरिकेची प्रवासी विमान वाहतूक थांबविली जाऊ शकते, असा दावा ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. याआधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडाच्या सीमारेषा पूर्णपणे बंद केल्या आहेत.

जगभरातील काही देश औद्योगिक कंपन्या आणि सार्वजनिक ठिकाणे सुरू करण्याच्या तयारीत असताना, या साथीची सर्वात भयंकर दुसरी लाट अजून धडकायची आहे, असा इशारा ‘युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेंशन अँड कंट्रोल’ या विभागाच्या प्रमुख डॉ. एंड्रिया अमोन यांनी दिला. अमेरिका आणि युरोपमध्ये साथीची दुसरी लाट कधी धडकेल ते सांगता येणार नाही, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणे अमेरिका आणि युरोपीय देशांना फार कठीण जाईल, असा इशारा अमोन यांनी दिला आहे.

leave a reply