चीनमधील ‘अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’ बंद

‘अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’बीजिंग/वॉशिंग्टन – चीनच्या सत्ताधारी राजवटीने चेंगडू शहरातील ‘अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. चीनच्या ‘मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल अफेअर्स’कडून यासंदर्भातील नोटिस आल्याची माहिती चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख बेंजामिन वँग यांनी दिली. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने यावर प्रतिक्रिया देताना, ही घटना चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या मनमानी कारभाराचे प्रतीक असल्याचा आरोप केला आहे. गेल्या वर्षी अमेरिका व चीनमध्ये सुरू झालेल्या राजनैतिक संघर्षात चीनने चेंगडूतील अमेरिकेचे उच्चायुक्त कार्यालयही बंद केले होते.

सोमवारी चेंगडूतील ‘अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’ने आपल्या सदस्यांना सदर यंत्रणा काम थांबवित असल्याचे कळविले. चीनचे कायदे व नियमांनुसार ‘अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’ बंद होत असल्याचे सांगण्यात आले. चीनच्या ‘मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल अफेअर्स’कडून चेंगडूतील ‘अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’ला कार्यालय बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समोर आले आहे. एका देशात ‘चेंबर ऑफ कॉमर्स’ची एकच शाखा कार्यरत राहू शकते, असा नियम पुढे करून चेंगडूतील कार्यालय बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

‘अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’चेंगडूव्यतिरिक्त राजधानी बीजिंगमध्येही ‘अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’ कार्यरत आहे. चीनमध्ये कार्यरत असणाऱ्या अमेरिकी उद्योगांचा गट म्हणून ‘अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’ सक्रिय आहे. अमेरिका व चीनमध्ये व्यापार वाढविण्यासाठीही हा गट सक्रिय आहे. चीनने चेंगडूतील कार्यालय बंद करण्याच्या निर्णयावर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून प्रतिक्रिया उमटली आहे.

‘चीनने चेंगडूतील चेंबर ऑफ कॉमर्स बंद करण्याबाबत घेतलेला निर्णय सत्ताधारी कम्युनिस्ट ‘अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’राजवटीच्या अपारदर्शक व मनमानी धोरणाचे प्रतीक आहे. हे धोरण परदेशी कंपन्या व गुंतवणुकीबाबत आकस प्रदर्शित करीत आहे’, अशी नाराजी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने व्यक्त केली. त्याचवेळी चिनी यंत्रणांनी जर काही वाद असेल तर तो चर्चा करून सोडवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

गेली काही वर्षे अमेरिका व चीनमध्ये व्यापारासह अनेक पातळ्यांवर संघर्ष सुरू आहे. अमेरिकेने चीनच्या कारवायांविरोधात अनेक निर्णय घेतले असून निर्बंधही लादले आहेत. अमेरिकेच्या कारवाईविरोधात चीननेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून, चेंगडूतील ‘अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’ बंद करण्याचा निर्णय त्याचाच भाग असल्याचे दिसते.

leave a reply