इराणमधील आणखी एका संशयास्पद स्फोटाने वीज पुरवठा खंडित

तेहरान – इराणमधील संशयास्पद स्फोटांची मालिका सुरू असून दोन दिवसांपूर्वी राजधानी तेहरानजवळ झालेल्या स्फोटानंतर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. इराणच्या सरकारी रेडिओ वाहिनीने या स्फोटाची माहिती प्रसिद्ध केली. पण इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या स्फोटाचे दावे फेटाळून लपवाछपवी केल्याचे बोलले जाते. दरम्यान, या स्फोटांच्या मालिकेमुळे इराणच्या राजवटीवरील दबाव वाढत असल्याचा दावा केला जातो.

Iran-Electric Supplyराजधानी तेहरान जवळच्या कोद शहरातील एका लष्करी तळावर संशयास्पद स्फोट झाल्याची माहिती इराणच्या सरकारी रेडिओवाहिनी ‘आयआरआयबी’ने दिली होती. या स्फोटामुळे साधारण पाच मिनिटांसाठी कोद शहरात वीज पुरवठा खंडित झाल्याचे या रेडिओवाहिनीने म्हटले होते. तर, कोद शहराच्या गव्हर्नरनी अशाप्रकारचा कुठलाही स्फोट झाला नसल्याचे सांगून ही एक अफवा असल्याचे म्हटले होते. मात्र, इराणी लष्करी विश्लेषक फबियन हिन्झ यांनी अमेरिकी वर्तमानपत्र ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ला दिलेल्या माहितीत, तेहरानजवळील दोन भुयारी तळांवर स्फोट झाल्याचे म्हटले आहे. यामध्ये रासायनिक शस्त्रास्त्रांच्या संशोधनाशी संबंधित आणि लष्करी शस्त्रास्त्रनिर्मितीशी निगडीत कारखान्यांचा समावेश असल्याचे हिन्झ यांनी सांगितले.

मात्र इराणच्या सरकारी व लष्करी यंत्रणा कुठल्याही संशयास्पद स्फोटाचे दावे फेटाळत आहेत. गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीत इराणमध्ये किमान सहा संशयास्पद स्फोट झाले आहेत. इराणच्या अणुप्रकल्पापासून क्षेपणास्त्र तळ, रासायनिक कारखाना, वीजनिर्मिती प्रकल्प या ठिकाणी हे स्फोट झाले. याव्यतिरिक्त तेहरानमधील एका रुग्णालयात झालेल्या स्फोटाकडेही संशयाने पाहिले जाते. या रुग्णालयातील गॅस पाईपलाईनमध्ये झालेल्या या स्फोटात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा बळी गेला होता. या स्फोटांच्या मालिकेमागे इस्रायल असल्याचा दावा इराणी यंत्रणा करीत आहेत. पण इराण सरकार उघडपणे इस्रायलला दोष देण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.

leave a reply