कॅनडात नवी ‘अनमार्कड् चिल्ड्रन मास ग्रेव्ह’ सापडली

ओटावा – अमेरिकेच्या सीमेला जोडून असलेल्या कॅनडाच्या सस्कॅचवान प्रांतात शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांचे आणखी एक सामूहिक थडगे सापडले आहे. हे थडगे ‘अनमार्कड् चिल्ड्रन मास ग्रेव्ह’ अर्थात कोणतीही ठोस नोंद नसणारी जागा असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. अवघ्या महिन्याभराच्या कालावधीत मुलांचे ‘मास ग्रेव्ह’ सापडण्याची कॅनडातील ही दुसरी घटना आहे. नव्या घटनेनंतर कॅनडातील मूळ निवासी (इंडिजिनिअस) जमातींना ज्या यातना सहन कराव्या लागल्या, त्याची पूर्ण जबाबदारी एक देश म्हणून कॅनडाला स्वीकारावी लागेल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान जस्टिन ट्य्रुड्यू यांनी दिली आहे.

कॅनडाच्या सस्कॅचवान प्रांतातील ‘द मेरिव्हल इंडियन रेसिडेन्शिअल स्कूल’जवळ ‘अनमार्कड् चिल्ड्रन मास ग्रेव्ह’ आढळली आहे. शाळेजवळच्या भागातील या सामूहिक थडग्यात सुमारे 751 शवांचा समावेश आहे. ही सर्व मुले कॅनडातील मूळ निवासी अथवा आदिवासी (इंडिजिनिअस कम्युनिटी) म्हणून ओळखण्यात येणार्‍या जमातींमधील आहेत. हे थडगे ‘इंडिजिनिअस कम्युनिटी’च्या मुलांच्या इतिहासाशी निगडित सर्वात मोठा व महत्त्वाचा शोध ठरतो, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

19व्या व 20व्या शतकात कॅनडातील ख्रिस्तधर्मियांच्या गटाकडून मोठ्या प्रमाणात ‘रेसिडेन्शिअल स्कूल्स’ची उभारणी करण्यात आली होती. यातील 130 शाळांना कॅनडा सरकारकडून अर्थसहाय्य पुरविण्यात आले होते. ‘द मेरिव्हल इंडियन रेसिडेन्शिअल स्कूल’ त्यापैकीच एक असल्याचे समोर आले आहे. मे महिन्यात कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील कॅमलूप्स शहरातील एका ‘रेसिडेन्शिअल स्कूल’जवळ मुलांचे सामूहिक थडगे असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर सस्कॅचवान प्रांतातील यंत्रणांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शोधमोहीम हाती घेतली होती.

पंतप्रधान ट्य्रुड्यू यांनी, सस्कॅचवान प्रांतातील घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. ‘ही घटना कॅनडाच्या मूळ निवासींना सहन कराव्या लागलेल्या वंशद्वेष, भेदभाव व अन्यायाची लज्जास्पद आठवण आहे. या भयंकर इतिहासाची जाणीव ठेवणे हा कॅनडाच्या जनतेच्या जबाबदारीचा भाग ठरतो’, असे पंतप्रधान ट्य्रुड्यू म्हणाले. कॅनडातील विरोधी पक्षांनी, पंतप्रधान फक्त शाब्दिक मलमपट्टी करीत असून त्यांच्या संवेदना कृतीतून दिसत नाहीत, असा आरोप केला आहे.

शाळांमध्ये घडलेल्या घटनांचा तपास करण्यासाठी ‘ट्रुथ अ‍ॅण्ड रिकौन्सिलेशन कमिशन’ची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाने, शाळांमध्ये घडलेले प्रकार हा सांस्कृतिक वंशसंहाराचा (कल्चरल जिनोसाईड) भाग असल्याचा ठपका ठेवला होता. 2008 साली तत्कालिन कॅनडा सरकारने ‘फर्स्ट नेशन्स’ जमातींविरोधात राबविण्यात आलेल्या धोरणांबद्दल जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर कॅनडा सरकारने बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी तसेच सदर जमातींना सामावून घेण्यासाठी विशेष मोहिमही हाती घेतली होती.

leave a reply