इस्रायलशी सहकार्य करणारे अरब देश त्याच आगीत होरपळतील

- इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याची धमकी

तेहरान – अरब देशांनी इस्रायलसह सहकार्य प्रस्थापित करू नये. असे झाल्यास इस्रायल ज्या आगीत होरपळत आहे, त्याच आगीत अरब देशही होरपळून निघतील’, अशी धमकी इराणच्या क्षेपणास्त्र विभागाचे प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांनी दिली. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ट्रम्प प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांची पुनरावृत्ती करू नये, असेही सलामी यामनी धमकावले.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने आपल्या नौदलात ३४० स्पीडबोट्स दाखल केल्या आहेत. यामध्ये ड्रोन्सवाहक तसेच क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या स्पीडबोट्सचाही समावेश आहे. या स्पीडबोट्स होर्मुझचे आखात आणि पर्शियन आखातातही तैनात केल्या जाणार असल्याची घोषणा रिव्होल्युशनरी गार्ड्सने केली आहे. गेल्या आठवड्यातच अमेरिकेने या सागरी क्षेत्रात तैनात असलेली ‘युएसएस निमित्झ’ ही विमानवाहू युद्धनौका माघारी बोलावली होती. अशा परिस्थितीत, इराणच्या ३४० स्पीडबोट्सच्या तैनातीमुळे येत्या काळात पर्शियन आखातातील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता असल्याचा दावा आखाती तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

या स्पीडबोट्सच्या जलावतरणाच्या कार्यक्रमात बोलताना मेजर जनरल सलामी यांनी ‘अब्राहम करारा’द्वारे इस्रायलसह सहकार्य प्रस्थापित करणार्‍या संयुक्त अरब अमिरात (युएई), बाहरिन या अरब देशांना धमकावले. ‘इस्रायलची राजवट ही शापित असून ज्या कुणा देशाबरोबर या राजवटीने सहकार्य प्रस्थापित केले, ते भ्रष्टच बनले आहेत. आखातातील इराणविरोधक अरब राजवटींनी इस्रायलच्या राजवटीबरोबर मैत्री करण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण हे दुर्दैवी सहकार्य फार काळ टिकणारे नाही. ज्या आगीत आज इस्रायल होरपळत आहे, त्याच आगीत तुम्हीही होरपळून निघाल’, अशी धमकी सलामी यांनी दिली. अरब जनतेने त्यांच्या राजवटीचे इस्रायलबरोबरचे सहकार्य खपवून घेऊ नये, अशी चिथावणी सलामी यांनी दिली.

या व्यतिरिक्त मेजर जनरल सलामी यांनी अमेरिकेतील बायडेन प्रशासनालाही धमकावले. ‘इराणविरोधातील मानसिक दबावतंत्राच्या युद्धात अमेरिका सपशेल पराभूत झाली आहे. तेव्हा बायडेन प्रशासनाने पुन्हा ही अपयशी धोरणे राबविण्याची आवश्यकता नाही. इराण आपल्या स्वातंत्र्याचा सौदा करणार नाही’, असे सलामी म्हणाले. तसेच इराण यशस्वीरित्या निर्बंधांच्या जाळ्यातून बाहेर निघाला असून यापुढे कुठलेही निर्बंध इराण खपवून घेणार नसल्याचा इशारा सलामी यांनी दिला.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून इराणने अणुकराराबाबत अधिकच आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. अमेरिकेच्या कुठल्याही मागण्या मान्य करणार नसल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. बायडेन प्रशासनाला अणुकरार करायचा असेल तर तो इराणच्या शर्थींवर करावा लागेल व त्यासाठी बायडेन प्रशासनाकडे अवघ्या दोन आठवड्यांची मुदत शिल्लक आहे, असे इराणने बजावले आहे .

leave a reply