लष्करप्रमुखांची गोवा शिपयार्डला भेट

- लडाखच्या पँगॉंग त्सो सरोवरात गस्तीसाठी उभारण्यात येणार्‍या जहाजांच्या कामांची पाहणी

गोवापणजी – लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी शनिवारी गोवा शिपयार्डला भेट दिली. लष्करप्रमुखांनी येथे लडाखमध्ये तैनात जवानांना पँगॉंग त्सो सरोवरात गस्तीसाठी उभारण्यात येत असलेल्या गस्ती जहाजांच्या कामाचा आढावा घेतला. दोन दिवसांपूर्वी भारत आणि चीनने सैनिक लडाखच्या एलएसीवरील गोग्रा येथून माघार घेतल्याची माहिती लष्कराने जाहीर केली होती. मात्र अजूनही लडाखच्या हॉट स्प्रिंग आणि डेप्सांगमध्ये चीन सैनिक मागे हटलेले नाहीत. पँगोग त्सो सरोवर क्षेत्रात वारंवार चीन सैनिकांकडून घुसखोरीच्या घटना घडत असतात. त्यामुळे येथे तैनात लष्करी जवानांना गस्तीसाठी आधुनिक जहाजे उपलब्ध व्हावीत यासाठी ही जहाजे खरेदी केली जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांनी गोवा शिपयार्डला दिलेल्या भेट महत्त्वाची ठरते.

चीनच्या लडाखमधील घुसखोरीमुळे गेल्यावर्षापासून भारताचा चीनबरोबरील तणाव अधिकच वाढला आहे. जून महिन्यात गलवानमध्ये भारतीय सैनिक आणि चीनच्या जवानांमध्ये संघर्ष होण्याआधी पँगॉंग त्सो सरोवरातही दोन्ही देेशांच्या जवान एकमेकांसमोर खडे ठाकले होते. या सरोवराच्या मोठ्या भागावर दावा करीत चीन येथे वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत असतो. गलवानच्या संघर्षानंतर भारताने आता चीनला लागून असलेल्या सर्वच सीमेवर आपली तैनाती वाढविली आहे. गस्ती आणि टेहळणीसाठी आधुनिक यंत्रणांचा वापर केला जात आहे. तसेच सैनिकांनीही आधुनिक शस्त्रे व साहित्य पुरविले जात आहे. याचअंगर्तत मशिनगन, टेहळणी गिअर बसविण्यात आालेली १२ आधुनिक गस्ती जहाजे खरेदी करण्याचा निर्णय झाला होता. आपत्कालीन खरेदीअंतर्गत ही जहाजे खरेदी करण्यात आली आहेत.

या जलदगती गस्ती जहजांचा आराखडा हा गोवा शिपयार्डनेच तयार केला आहे. यातील काही जहाजे बनून तयार असून त्याच्या चाचण्याही सुरू आहेत. तसेच इतर जहाजांची कामे वेगाने सुरू आहेत. ही सर्व पाहणी लष्करप्रमुखांनी केली. गोग्रामधून चीनचे सैनिक मागे हटल्यानंतर दोनच दिवसांनी लष्करप्रमुखांनी गोवा शिपर्याडला दिलेल्या या भेटीद्वारे एक संदेश दिला आहे, असा दावा विश्‍लेषक करीत आहेत. भारत चीन सीमेवर आपली तयारी अशीच कायम ठेवणार आहे, असा स्पष्ट संकेत यातून दिला जात आहे.

याआधी लष्करप्रमुखांनी सदर्न कमांडचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी पुण्यातील पिंपरी येथील टाटा मोटर्सच्या प्रकल्पाला भेट दिली होती. येथे लष्करासाठी चिलखती वाहने, लढाऊ सहाय्यक वाहनांची निर्मिती सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी उत्तरेकडील अस्थीर सीमेवरील आव्हानांचा समना करताना भारतीय लष्कर अधिक मजबूत झाल्याचे म्हटले होते. गोग्रामधून चीन सैनिक माघारी फिरत असताना लष्करप्रमुखांनी ही टिप्पणी केली होती. त्यानंतर टाटाच्या प्रकल्पात व गोवा शिपयार्डमधील लष्करी वाहने व गस्ती जहाजांच्या उभारणीच्या कामाचा लष्करप्रमुखांनी घेतलेला आढावा महत्त्वाचा ठरतो.

leave a reply