लष्कर, नौदल आणि वायुसेना स्वार्म व सुसाईड ड्रोन्सची खरेदी करणार

- लष्कराकडून 100 स्वार्म ड्रोन्सची ऑर्डर

नवी दिल्ली – ‘नो कॉन्टॅक्ट वॉरफेअर’साठी भारत सज्ज होत असून लष्कराने 100 स्वार्म ड्रोन्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्टिफीशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानावर आधारीत या अत्याधुनिक ड्रोन्ससाठी लष्कराने बंगळुरू येथील एका कंपनीला ऑर्डर दिल्याचे वृत्त आहे. चीनने स्वार्म ड्रोन तंत्रज्ञानात आघाडी घेतली आहे. आपल्या लष्कराच्या ताफ्यात चीन स्वार्म ड्रोन्सची संख्या वाढवित आहे. अशावेळी भारतही या आघाडीवर आपली सज्जता वाढवित आहे. स्वार्म ड्रोनबरोबर लष्कर सुसाईड ड्रोन्सही खरेदी करीत आहे. याशिवाय वायुसेना आणि नौदलानेही अशाच ड्रोन्ससाठी ऑर्डर दिल्याची बातमी आहे. ही सर्व खरेदी तिन्ही संरक्षण दलांनी देण्यात आलेल्या इमर्जन्सी अधिकाराअंतर्गत करण्यात येत आहे.

‘नो कॉन्टॅक्ट वॉरफेअर’ अर्थात जीवाची जोखीम न पत्करता केल्या जाणाऱ्या युद्धतंत्राचे महत्त्व वाढत आहे. अमेरिका, इस्रायल, रशिया, ब्रिटनसारखे देश आपल्या ताफ्यात मानवरहीत ड्रोनची संख्या वाढवत आहेत. छोट्या आकाराच्या व कमी उंचीवरून उडून शत्रूच्या रडारला गुंगारा देऊ शकणाऱ्या स्वार्म ड्रोन पुढील काळात युद्धात महत्त्वाचे सिद्ध होणार आहेत. त्यामुळे स्वार्म ड्रोन्सची संख्याही हे देश वाढवित आहेत. चीननेही यामध्ये आघाडी घेतली आहे. गेल्यावर्षी चीनने एकसाथ 200 स्वार्म ड्रोन उडवून चाचण्या घेतल्या होत्या.

या पार्श्‍वभूमीवर जानेवारी महिन्यात भारतीय लष्कराने ‘आर्मी डे’च्या निमित्ताने आयोजित संचलनात आपल्या या स्वार्म ड्रोन शक्तीचे दर्शन घडविले होते व भारतही नव्या आव्हानांसाठी आधुनिक युद्धतंत्राने सज्ज होत असल्याचे जगाला दाखविले होते. ‘आर्मी डे’ परेडमध्ये एकसाथ 75 स्वार्म ड्रोनने उड्डाण करीत थरारक प्रात्यक्षिके केली होती. या प्रात्यक्षिकांमध्ये शत्रूचे धावपट्ट्या, महत्वाची लष्करी ठाणी, रणगाडे उद्ध्वस्त करण्यात आले. मदर ड्रोन सिस्टिमचा यामध्ये वापर करण्यात आला होता. थोड्या मोठ्या आकाराच्या ड्रोनशीपमधून अर्थात मदर ड्रोनच्या पोटातून बाहेर पडणाऱ्या चाईल्ड ड्रोन अर्थात छोट्या ड्रोन्सनी प्रत्याक्षिकादरम्यान आपली लक्ष्ये अचूक भेदली होती. भारतीय लष्कर खरेदी करीत असलेले स्वार्म ड्रोन्स हे 25 किलोमीटर दूरवरूनच आपले लक्ष्य भेदू शकतील. तसेच पाच ते दहा किलो स्फोटके वाहून नेऊ शकतील. तसेच युद्धप्रसंगी औषधे व इतर आवश्‍यक साहित्यांचा पुरवठाही जवानांना या माध्यमातून करता येईल, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्याने दिली आहे. या 100 ड्रोन्सचा प्रत्येक टप्प्यात 50 अशा पद्धतीने दोन टप्प्यात बंगळुरू स्थिती कंपनीकडून लष्कराला पुरवठा केला जाणार आहे, अशी माहितीही लष्करी सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध झाली आहे. मात्र याबाबतचे अधिक तपशील उघड करण्यात आलेले नाहीत.

दरम्यान, भारतीय लष्कराने लॉइटरिंग म्युनिशन पद्धतीच्या 100 ड्रोनची ऑर्डरही लष्कराने दिल्याची माहिती आहे. या ड्रोनला सुसाईड ड्रोन किंवा कामिकाझे ड्रोन या नावानेही ओळखले जाते. ही ड्रोन लक्ष्याची पाहणी करून आपल्या दिलेले लक्ष्य नष्ट करण्यासाठी स्फोटकासह त्यावर आदळतात. म्हणून याला सुसाईड ड्रोन म्हटले जाते. काही महिन्यांपूर्वी अझरबैजान आणि अर्मेनियामध्ये झालेल्या युद्धात अशा ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला होता. नौदलानेही अशा ड्रोन्सची ऑर्डर दिल्याचे वृत्त आहे.

तसेच भारतीय वायुसेनेने स्कायस्ट्रायकर या सुसाईड ड्रोन्सची खरेदी करीत आहे. 120 स्कायस्ट्रायकरसाठी वायुसेनेने एका भारतीय कंपनीला ऑर्डर दिली आहे. परदेशी कंपनी व भारतीय कंपनी संयुक्त उपक्रमाअंतर्गत या ऑर्डर पुर्ण करणार आहेत.

गेल्यावर्षी चीनबरोबर तणाव वाढल्यावर भारतीय लष्कराला आपत्कालीन स्थितीत संरक्षण साहित्य खरेदी करण्यासाठी देण्यात आलेल्या आर्थिक अधिकारात वाढ करण्यात आली होती. याच इमर्जन्सी अधिकाराअंतर्गत ही खरेदी करण्यात येत असून चीन आणि पाकिस्तान सीमेवरील आव्हाने बघता या खरेदीचे महत्त्व वाढले आहे.

leave a reply