आसियन देशांच्या चीनविरोधी हालचालींना वेग

कौलालंपूर/जाकार्ता/बीजिंग – चीनकडून साऊथ चायना सीमध्ये सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी ‘आसियन’ देशांनी आपल्या हालचालींना वेग दिला आहे. रविवारी मलेशियाच्या हवाई हद्दीत चीनच्या विमानांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र मलेशियन हवाईदलाने चीनच्या विमानांना पिटाळून लावले. मलेशियाने राजनैतिक पातळीवर तीव्र निषेध नोंदविला असून चिनी राजदूतांना समन्स बजावले आहे. तर इंडोनशियाने ‘साऊथ चायना सी’मधील चीनची अरेरावी रोखण्यासाठी आपल्या नौदलातील पाणबुड्यांची संख्या तिपटीने वाढविण्याची तयारी केली. चीनच्या प्रभावाखाली असणार्‍या कंबोडियाने आता अमेरिकेशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

आसियन देशांच्या चीनविरोधी हालचालींना वेगचीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने गेल्या काही महिन्यात ‘साऊथ चायना सी’मधील हालचाली अधिकच आक्रमक केल्या आहेत. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या युद्धनौका, लढाऊ विमाने, टेहळणी विमाने तसेच ‘नेव्हल मिलिशिया’ सातत्याने इतर देशांच्या हद्दीत घुसखोरी करीत आहेत. चीनच्या या सातत्याने सुरू असलेल्या कारवायांमुळे त्रस्त झालेल्या ‘आसियन’ देशांनी चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी पावले उचलली आहेत.

रविवारी चीनच्या तब्बल 16 विमानांनी मलेशियाच्या ‘बोर्नो स्टेट’नजिक असलेल्या हवाईहद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. चिनी विमानांना ‘वॉर्निंग’ देण्यासाठी मलेशियाने आपल्या ‘लबुआन एअरबेस’वरून विमाने रवाना केली. मलेशियन विमानांच्या या तैनातीनंतर चीनची विमाने माघारी गेली. चीनच्या विमानांची ही घुसखोरी मलेशियाच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे मलेशियन हवाईदलाने बजावले आहे. मलेशियाच्या परराष्ट्र विभागाने या घटनेचा निषेध नोंदविणारी नोट चीनला पाठविली आहे. त्याचवेळी मलेशियातील चीनच्या राजदूतांना समन्स धाडले असून संपूर्ण प्रकरणाचा खुलासा मागितला आहे. ‘मलेशियाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. राजनैतिक पातळीवर एखाद्या देशाशी मैत्रीपूर्ण संबंध असणे, याचा अर्थ आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करु असा होत नाही’ या शब्दात मलेशियाचे परराष्ट्रमंत्री हिशमुद्दिन हुसेन यांनी चीनला खडसावले. चीनने याप्रकरणी सारवासारवीची भूमिका घेतली असून विमाने आपल्या नियमित प्रशिक्षणाचा भाग असलेल्या क्षेत्रात सराव करीत होती, असे म्हटले आहे.आसियन देशांच्या चीनविरोधी हालचालींना वेग

चीनच्या कारवायांचा मुकाबला करण्यसाठी इंडोनेशियाने आपल्या नौदलातील पाणबुड्यांची संख्या तिपटीने वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ‘आसियन’ देशांमध्ये सर्वाधिक सागरी क्षेत्र इंडोनेशियाचे असले तरी या देशाची नौदल क्षमता त्यामानाने कमी असल्याचे मानले जाते. सध्या इंडोनेशियाकडे चारच पाणबुड्या असून त्यांची संख्या 12 पर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी दक्षिण कोरिया, जपान, रशिया व फ्रान्सबरोबर बोलणी सुरू असून दक्षिण कोरियाबरोबर सहा पाणबुड्यांसंदर्भातील करार अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येते.

आसियन देशांच्या चीनविरोधी हालचालींना वेगदरम्यान, ‘आसियन’ देशांमधील चीनच्या प्रभावाखाली असणारा देश कंबोडियाला अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्री वेंडी शेर्मन यांनी भेट दिली. ही भेट कंबोडियाकडून अमेरिकेशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे सांगण्यात येते. शेर्मन यांच्या भेटीच्या पार्श्‍वभूमीवर कंबोडियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने अमेरिकेबरोबरील संबंध ‘रिसेट’ करण्याची गरज असल्याचा लेखही प्रसिद्ध केला आहे.

गेले काही महिने फिलिपाईन्स व चीनमध्ये असणारा तणाव निवळण्याऐवजी वाढत चालला आहे. फिलिपाईनच्या वरिष्ठ अधिकारी ‘एलिझाबेथ ते’ यांनी, चीन संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाचे पालन करीत नसल्याचा आरोप केला. मार्च महिन्यात चीनने आपली शेकडो मच्छिमार जहाजे फिलिपिनी हद्दीत घुसविल्यानंतर फिलिपाईन्समध्ये चीनविरोधात तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात फिलिपाईन्सचे सरकार चीनच्या विरोधात आपण कठोर भूमिका घेऊ शकतो, असे वारंवार बजावत आहे. तसेच या सागरी क्षेत्रातील गस्त वाढवून फिलिपाईन्सने आपण चीनची पर्वा करणार नसल्याचे दाखवून दिले आहे.

leave a reply