सिरियन रुग्णालयावरील हल्ल्यात 14 जणांचा बळी

- तुर्कीचा कुर्द बंडखोरांवर आरोप

सना/अंकारा – सिरियाच्या आफ्रिन शहरात रुग्णालय आणि रहिवाशी भागात झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये 14 जणांचा बळी गेला. रुग्णालयाला लक्ष्य केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरातून यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. तर कुर्द बंडखोरांनी तोफांचा वापर करून हा घातपात घडविल्याचा आरोप करून तुर्कीने सिरियातील कुर्दांच्या तेल रिफात शहरावर हल्लेही चढविले. दरम्यान, ब्रुसेल्स येथे नाटोच्या सदस्य देशांची बैठक सुरू होणार आहे. बरोबर त्याआधी सिरियन रुग्णालयावर झालेला हल्ला व त्यासाठी तुर्कीने कुर्दांवर केलेले आरोप, याकडे संशयाने पाहिले जाते.

सिरियन रुग्णालयावरील हल्ल्यात 14 जणांचा बळी - तुर्कीचा कुर्द बंडखोरांवर आरोपसिरियाच्या उत्तरेकडील आफ्रिन शहरात दोन दिवसांपूर्वी मोठे स्फोट झाले. पहिल्या हल्ल्यात येथील रहिवाशी भागाला तर दुसर्‍या हल्ल्यात येथील रुग्णालयाला लक्ष्य करण्यात आले. यामध्ये 14 जणांचा बळी गेला तर 27 जण जखमी झाले. या स्फोटाचे फोटोग्राफ्स सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले असून सदर भागाची मोठी पडझड झाल्याचे दिसत आहे. या स्फोटाची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

पण तुर्कीने आफ्रिन शहरातील हल्ल्यांसाठी ‘वायपीजी’ आणि ‘पीकेके’ या कुर्दांच्या दोन बंडखोर संघटनांना जबाबदार धरले. तुर्कीने दहशतवादी घोषित केलेल्या या दोन्ही संघटनांनी तोफांद्वारे हे हल्ले चढवून युद्धगुन्हा केल्याचा आरोप तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने केला. तसेच या भ्याड हल्ल्याचा निषेध करून कुर्दांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने केली. पण सिरियातील अस्साद सरकारबरोबर आघाडी केलेल्या सिरियन कुर्दांनी तुर्कीचे हे आरोप फेटाळले.

यानंतर पुढच्या काही तासातच तुर्कीने सिरियाच्या उत्तरेकडील तेल रिफात शहरातील कुर्दांच्या ठिकाणांवर हल्ले चढविले. तुर्कीच्या या हल्ल्यात तेल रिफात शहरातील जीवितहानीचे तपशील समोर आलेले नाहीत. तेल रिफातच्या शेजारील सिरियाच्याच हताय प्रांतात तुर्कीच्या लष्कराचा तळ आहे. सिरियाच्या उत्तरेकडील कुर्दांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागांचा ताबा घेण्यासाठी तुर्कीने गेल्या काही वर्षांपासून मोहीम छेडली आहे. यासाठी आपल्या देशातील तसेच सिरियातील हल्ल्यांसाठी कुर्दांना जबाबदार धरून तुर्की सिरिया व इराकमधील कुर्दांच्या ठिकाणांवर हल्ले चढवित आहे.

येत्या काही तासात ब्रुसेल्स येथे नाटोची बैठक सुरू होत आहे. या बैठकीत नाटोच्या सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत. त्याआधी तुर्कीने कुर्दांवर केलेले आरोप लक्षवेधी ठरतात.

leave a reply