इराणच्या नातांझ अणुप्रकल्पावरील हल्ला ‘स्टक्सनेट’पेक्षाही भयंकर होता

- अमेरिकी वर्तमानपत्राचा दावा

न्यूयॉर्क – या महिन्याच्या सुरुवातीला इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात लागलेल्या आगीमागे इस्रायल असल्याचा आरोप अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने केला आहे. दहा वर्षांपूर्वी इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पावर चढवलेल्या स्टक्सनेटच्या सायबर हल्ल्यापेक्षाही आत्ताचा हल्ला व त्याचे परिणाम भयंकर असल्याचा दावा या वर्तमानपत्राने केला आहे. तर या हल्ल्यामुळे इराणचा अणुकार्यक्रम दोन वर्षांसाठी मागे गेल्याची शक्यताही या वर्तमानपत्राने वर्तविली आहे. दरम्यान, वर्तमानपत्रातून केल्या जाणार्‍या आरोपांवर प्रतिक्रिया न देण्याचे धोरण इस्रायली लष्कराने कायम ठेवले आहे.

Iran-Nantanzhगेल्या आठवड्यात इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात झालेल्या स्फोटासाठी दोन प्रमुख कारणे जबाबदार असू शकतात, ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या अमेरिकी वर्तमानपत्राने आखातातील गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्याने म्हटले आहे. अणुप्रकल्पातील गॅस पाईपलाईनमध्ये बॉम्ब पेरुन हा स्फोट घडविल्याचा दावा केला जात असल्याचे अमेरिकी वर्तमानपत्राने म्हटले आहे. पण ही शक्यता दुर्मिळ असल्याचेही या वर्तमानपत्राने सांगितले. याव्यतिरिक्त इराणी अणुप्रकल्पावरील सायबर हल्ल्याची शक्यता या वर्तमानपत्राने वर्तविली.

२०१० साली इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या नातांझ आणि बुशहेर अणुप्रकल्पावर सायबर हल्ले चढविले होते. स्टक्सनेट व्हायरसच्या या सायबर हल्ल्यांमुळे इराणच्या अणुप्रकल्पातील हजारो सेंट्रीफ्यूजेस निकामी झाले होते. याचा थेट परिणाम इराणच्या अणुकार्यक्रमावर झाला होता. गेल्या आठवड्यात नातांझ अणुप्रकल्पावर झालेला सायबर हल्ला या ‘स्टक्सनेट’च्या सायबर हल्लापेक्षाही भयंकर असल्याचा दावा अमेरिका वर्तमानपत्राने केला आहे. या सायबर हल्ल्यामुळे इराणच्या अणुप्रकल्पाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून इराणचा अणुकार्यक्रम किमान दोन वर्षांसाठी पिछाडीवर गेल्याचे या वर्तमानपत्राने आखाती गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे.

‘कॅर्नी इंडोव्हमेंट फॉर इंटरनॅशनल पीस’ या अमेरिकी अभ्यासगटाचे वरिष्ठ विश्लेषक करीम सज्जादपूर यांनी अमेरिकी वर्तमानपत्राशी बोलताना दिलेल्या माहिती या हल्ल्याचे इराणच्या राजवटीवर मोठे परिणाम झाल्याचे म्हटले आहे. याआधीच आर्थिक संकट आणि अमेरिकेच्या निर्बंधांचा सामना इराणच्या राजवटीला करावा लागत आहे. या सायबर हल्ल्यामुळे इराणच्या राजवटीविरोधातील असंतोष वाढू लागल्याचे या विश्लेषकांनी म्हटले आहे.

leave a reply