जेरूसलेमवरील हल्ल्याने क्षेत्रीय युद्धाचा भडका उडेल

- हिजबुल्लाह प्रमुखाची इस्रायलला धमकी

बैरूत – ‘जेरूसलेम किंवा येथील धार्मिक स्थळावर हल्ला चढविला तर या क्षेत्रात युद्धाचा भडका उडेल, याची जाणीव इस्रायलला झाली असेल. त्यामुळे येत्या काळात इस्रायलने अशी चूक करू नये’, अशी धमकी लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाने दिली. यापुढच्या संघर्षात हिजबुल्लाह देखील हमासला साथ देईल, अशी घोषणा नसरल्लाने केली.

जेरूसलेमवरील हल्ल्याने क्षेत्रीय युद्धाचा भडका उडेल - हिजबुल्लाह प्रमुखाची इस्रायलला धमकीया महिन्याच्या सुरुवातीला इस्रायल आणि गाझातील हमास यांच्यात तीव्र संघर्ष भडकला होता. 11 दिवसांच्या या संघर्षात हमासने इस्रायलवर साडे चार हजारांहून अधिक रॉकेट हल्ले चढविले. तर लेबेनॉनमधूनही इस्रायलच्या दिशेने दोन वेळा रॉकेट हल्ले झाले होते. यामुळे हिजबुल्लाह देखील या संघर्षात सहभागी होऊन इस्रायलविरोधातील आघाडी व्यापक करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण या अकरा दिवसांच्या संघर्षापासून हिजबुल्लाह अलिप्त राहिल्याने आश्‍चर्य व्यक्त केले गेले.

मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाने ही धमकी दिली. हिजबुल्लाह ही इराणच्या प्रभावाखाली असलेली संघटना आहे. सध्या व्हिएन्ना येथे अमेरिका व इराणमध्ये अणुकरारावरून वाटाघाटी सुरू आहेत. अशा काळात हिजबुल्लाहने हमासला साथ देऊन इस्रायलवर हल्ले चढविले असते, तर अणुकरारावरील चर्चा धोक्या आली असती. म्हणूनच हिजबुल्लाह शांत राहिल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply