काबुलच्या विमानतळावरील हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती अधिकच भयंकर बनली

वॉशिंग्टन – काबुलच्या विमानतळावरील आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. अमेरिकेचे काही अधिकारी यासाठी ‘आयएस-इस्लामिक स्टेट’वर संशय व्यक्त करीत आहेत. तर अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असलेल्या पेंटॅगॉनच्या माजी अधिकाऱ्यांनी हा हल्ला तालिबानने किंवा तालिबानच्याच एका गटाने देखील घडविलेला असू शकतो, अशी शक्यता वर्तविलेली आहे. तसेच अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर होऊ देणार नाही, हे तालिबानने जाहीर केल्यामुळे अल कायदा व आयएस सारख्या दहशतवादी संघटना नाराज झालेल्या आहेत, याकडेही विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

काबुलच्या विमानतळावरील हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती अधिकच भयंकर बनलीअमेरिका, ब्रिटन व जर्मनीने काबुलच्या विमानतळावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असे बजावले होते. इथे उसळलेल्या प्रचंड गर्दीमुळे या विमानतळाची सुरक्षा धोक्यात आली होती. अशा परिस्थितीत इथे आत्मघाती हल्ले घडवून दहशतवादी संघटनांनी साऱ्या जगाला धक्का दिला. मात्र विमानतळाची सुरक्षा पूर्णपणे तालिबानच्या किंवा अमेरिकेच्याही हाती नसल्याने याची जबाबदारी निश्‍चित करणे अतिशय अवघड बनले आहे. तसेच यामागे कोणती दहशतवादी संघटना आहे, याचा माग काढणेही सोपे नसल्याचा दावा केला जातो.

अफगाणिस्तानची भूमी दहशतवादासाठी वापरली जाणार नाही, अशी ग्वाही तालिबानने दिली होती. त्यामुळे आयएस व अल कायदा या दहशतवादी संघटना नाराज झाल्या आहेत. तालिबानला धक्का देण्यासाठी या संघटनांना सदर आत्मघाती हल्ले घडविल्याची शक्यता आहे, असा दावा पेंटॅगॉनच्या माजी अधिकाऱ्याने केला. त्याचवेळी तालिबान ही एकजिनसी संघटना नाही, असे सांगून तालिबानमधील एका गटाने हा दहशतवादी हल्ला घडविल्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे या माजी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

या हल्ल्यांमुळे पुढच्या काळात अफगाणिस्तानात किती भयंकर परिस्थिती उद्भवू शकते, याची पूर्वसूचना मिळत असल्याचे जगभरातील विश्‍लेषक सांगत आहेत. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आली, तर दहशतवादी हल्ले होणार नाहीत, असे दावे काहीजणांकडून केले जात होते. पण काबुलच्या विमानतळावरील या आत्मघाती हल्ल्यांमुळे हे दावे निकालात निघालेले आहेत. तालिबान अफगाणिस्तानात सुरक्षा पुरवू शकणार नाही, हा संदेश साऱ्या जगाला मिळालेला आहे. म्हणूनच पुढच्या काळात अफगाणिस्तानातील सुरक्षाविषयक स्थिती हे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर खडे ठाकलेले सर्वात मोठे आव्हान ठरू शकेल.

leave a reply