बायडेन प्रशासनाच्या इराणबाबतच्या भूमिकेमुळेच सौदीच्या इंधनप्रकल्पांवर हल्ले सुरू

- अमेरिकन सिनेटरचा दावा

बायडेनवॉशिंग्टन – ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणवरील निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले तेव्हापासून अमेरिका व अमेरिकेच्या मित्रदेशांवरील हल्ले वाढू लागले आहेत. सौदी अरेबियाच्या इंधनप्रकल्पांवरील हल्ल्यांसाठी इराणच जबाबदार असल्याचे दिसते’, असा दावा अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर बिल हॅगर्टी यांनी केला. गेल्या आठवड्यात सौदीच्या इंधनप्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांवर अमेरिकन सिनेटर हॅगर्टी यांनी घणाघाती टीका केली होती व आंतरराष्ट्रीय पातळीवरही या हल्ल्याची निर्भत्सना झाली होती. गेल्या आठवड्यात सौदीच्या पूर्वेकडील रास तनूरा येथील अराम्को कंपनीच्या इंधनप्रकल्पावर क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ले झाले. यापैकी क्षेपणास्त्र हल्ले यशस्वीरित्या उधळल्याचा दावा सौदीच्या यंत्रणा करीत आहेत. तर ड्रोन हल्ल्यांमुळे या प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले नसल्याचे सौदीच्या माध्यमांचे म्हणणे आहे. येमेनमधील हौथी बंडखोरांनी रास तनूरा तसेच सौदीच्या पश्‍चिमेकडील जेद्दाह आणि नैऋत्येकडील जिझान इंधन प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली.

बायडेनपण रास तनूरा येथील अराम्कोच्या इंधन प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यासाठी इराण जबाबदार आहे. सौदीच्या राजघराण्याच्या वरिष्ठ सल्लागारांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना हा आरोप केला होता. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकन सिनेटमधील ‘फॉरेन रिलेशन्स कमिटी’चे सदस्य असलेल्या हॅगर्टी यांनी सौदीवरील या हल्ल्यांसाठी बायडेन प्रशासनाची भूमिका जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. ‘सौदीच्या इंधनप्रकल्पावर आणखी एक क्षेपणास्त्र हल्ला झाला व या हल्ल्यावर इराणची छाप आहे’, असे हॅगर्टी यांनी म्हटले आहे. ‘निर्बंधांतून सवलत देण्याची राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची इच्छा इराणच्या राजवटीला अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्रदेशांवर हल्ल्यासाठी प्रोत्साहित करीत आहे’, असा घणाघाती हल्ला हॅगर्टी यांनी चढविला. स्पष्ट उल्लेल केला नसला तरी इराकमधील अमेरिकेचे लष्करी तळ व दूतावासावर झालेल्या रॉकेट हल्ल्यांसाठी देखील हॅगर्टी यांनी इराणला जबाबदार धरले आहे. पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी इराकमधील हल्ल्यांप्रकरणी इराणचा उल्लेख करण्याचे टाळले होते. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

leave a reply