इराणकडून युएईच्या इंधनवाहू जहाजाच्या अपहरणाचा प्रयत्न

- ब्रिटनच्या नौदलाचा आरोप

अपहरणाचा प्रयत्नलंडन/दुबई – ‘युएईच्या इंधनवाहू जहाजाचे अपहरण करण्याचा अपयशी प्रयत्न झाला. इराणसमर्थक गट या अपहरणामागे होता’, असा गंभीर आरोप ब्रिटनच्या नौदलाने केला. तर हा एक मानसिक दबावतंत्राचा भाग असून आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे इराणने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात ओमानच्या सागरी क्षेत्राजवळ इस्रायली जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामागे इराण असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर युएईच्या जहाजाबाबत ही घटना घडल्यामुळे पर्शियन आखातातील तणाव वाढला आहे.

‘अस्फाल्ट प्रिन्सेस’ या इंधनवाहू जहाजाचे मंगळवारी अपहरण झाले होते. युएईतील ‘ग्लोरी इंटरनॅशनल’ या कंपनीचे हे जहाज ओमानच्या आखातात असताना इराणसमर्थक गटांनी या जहाजाचा ताबा घेतला होता, अशी माहिती ब्रिटनच्या नौदलाने प्रसिद्ध केली. काही तासानंतर अपहरणकर्त्यांनी या जहाजाचा ताबा सोडल्याचे ब्रिटनच्या नौदलाने स्पष्ट केले. इराणने या आरोपांची दखल घेऊन पाश्‍चिमात्य देश, इस्रायल आणि सौदी अरेबियाची माध्यमे इराणविरोधात गोंधळ निर्माण करणारी माहिती देत असल्याचा आरोप इराणच्या लष्करी अधिकार्‍याने केला. तसेच या देशांनी इराणविरोधात मानसिक दबावतंत्रयुद्ध छेडल्याचा ठपका ठेवला.

दरम्यान, गेल्या आठवड्यात इस्रायली जहाजावर झालेल्या ड्रोन्सच्या हल्ल्यांसाठी इराण जबाबदार असल्याचा आरोप इस्रायलसह अमेरिका, ब्रिटनने केला होता. त्यात मंगळवारच्या घटनेनंतर ओमानने आपल्या सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी गस्तीनौका आणि विमाने तैनात केली आहेत.

leave a reply