जम्मू – काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, दोन दहशतवादी ठार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळण्यात आला असून दोन दहशतवाद्यांना नियंत्रण रेषेजवळ ठार करण्यात आले. त्यांच्याकडून मोठा शस्त्र साठा सापडला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लाँचपॅडवर सुमारे २५० ते ३०० दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची माहिती मेजर जनरल विरेंद्र वत्स यांनी दिली. पुढील महिन्यात जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविलेल्या एक वर्ष पूर्ण होत असून यापार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडविण्याचे पाकिस्तान प्रयत्न करीत आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. तसेच पाकिस्तानच्या ‘बॅट’कडून हल्ला होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला आहे.

Jammu-Kashmir-Terroristsशनिवारी सकाळी नौगाम सेक्टरमध्ये तारेचे कुपण कापून घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना जवानांनी चकमकीत ठार केले. ठार झालेल्या दहशतवाद्यांजवळ दोन ‘एके असॉल्ट रायफल्ससह १०० बुलेट्स, एक पिस्तुल, हॅंडग्रेनेड सापडले आहेत. पिस्तूल चिनी बनावटीचे असून पाकिस्तान ऑर्डीनन्स फॅक्टरीत तयार करण्यात आलेले चार हॅंडग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.अशाच प्रकारच्या हॅण्डग्रेनेडचा वापर २००१ साली संसदेवर झालेल्या हल्ल्यावेळी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून करण्यात आला होता. भारतीय आणि पाकिस्तानी चलनातील दीड लाख रूपये देखील जप्त करण्यात आले आहेत.

दरम्याना भीम्बर गली आणि नौशेरा सेक्टरमध्ये सुरक्षादलाच्या जवानांवर पाकिस्तनाच्या ‘बॉर्डर अ‍ॅक्शन टीम’ अर्थात ‘बॅट’ कडून हल्ले होऊ शकतात, असा इशारा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. बॅटकडून याआधी सामान्य नागरिकांवरही हल्ले करण्यात आले होते. त्यामुळे या दोन सेक्टरमध्ये जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या ‘बॅट’ कमांडर्सनी दोन नागरिकांवर हल्ला केला होता. यातील एकाचा शिरच्छेद करण्यात आला होता. गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्यानंतर या भागातील गस्त वाढवण्यात आली असून रात्री अतिरिक्त जवानांची तैनाती करण्यात आली आहे.

leave a reply