अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील सैन्य माघारीनंतर चीनकडून प्रभाव वाढविण्याचे प्रयत्न

- अमेरिकन वेबसाईटचा दावा

वॉशिंग्टन/काबूल – अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारीस सुरुवात केली असतानाच, चीनकडून त्याचा लाभ उचलून अफगाणिस्तानातील प्रभाव वाढविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी चीन पाकिस्तानची मदत घेत असल्याचा दावा अमेरिकन वेबसाईटने केला आहे. या दोन्ही देशांसाठी अफगाणिस्तानातील भारताचा वाढता प्रभाव डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळेच अफगाणिस्तान अस्थिर करण्यासाठी पाकिस्तान व चीन प्रयत्न करीत असल्याचे संकेत अमेरिकन वेबसाईटच्या वृत्तात देण्यात आले आहेत.

Afganistan-Americaअमेरिकी लष्कर गेली दोन दशके अफगाणिस्तानात तालिबान व अल कायदाविरोधात दहशतवादविरोधी मोहीम राबवित आहे. २९ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतीकरार पार पडला असून करारानुसार अमेरिका अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेणार आहे. अमेरिकेने गेल्या सहा महिन्यात अफगाणिस्तानातील सुमारे साडेचार हजार जवान माघारी आणले असून पाच लष्करी तळ बंद केले आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये अफगाणिस्तानातील अमेरिकी सैन्याची संख्या पाच हजारांपर्यंत खाली आणण्याचे संकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिले आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानातून संपूर्णपणे सैन्यमाघारी घेतली तर चीन अफगाणिस्तानातला आपला प्रभाव वाढवेल, अशी चिंता अमेरिकी वेबसाईटने दिलेल्या वृत्तात व्यक्त करण्यात आली आहे.

यासाठी चीनने पाकिस्तानचे सहाय्य घेण्यास सुरुवात केली आहे. चीन व पाकिस्तानदरम्यान ‘इंटेलिजन्स शेअरिंग डील’ झाले असून या माध्यमातून चीनने अफगाणिस्तानमधील आपल्या हितसंबंधांचा विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पाकिस्तान चीनला अफगाणिस्तानच्या सुरक्षेबाबत गुप्त माहिती पुरवित असल्याचेही उघड झाले आहे. या बदल्यात पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना चीनमध्ये पार पडणाऱ्या संरक्षणविषयक उच्चस्तरीय बैठकीला निरीक्षक म्हणून उपस्थित राहता येईल. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या बैठकीचे स्वरूप गोपनीय असून त्यात पाकिस्तानी अधिकाऱ्यांना परवानगी मिळणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

पाकिस्तान अफगाणिस्तानातल्या दहशतवादी संघटनांना सहाय्य करतो. पाकिस्तानचे तालिबान तसेच ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेसोबत जवळचे संबंध आहेत. यामुळे अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध ताणले आहेत. त्याचवेळी अमेरिकी तैनाती व दहशतवादी हल्ल्यांमुळे चीनला आपल्या अफगाणिस्तानातील गुंतवणुकीबाबत चिंता असल्याचा उल्लेख अमेरिकी वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात आहे.

Afganistan-Americaचीनने अफगाणिस्तानाच्या खनिज प्रकल्पांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे चीनला अफगाणिस्तानातला प्रभाव वाढवायचा आहे. त्यासाठी चीन पाकिस्तानची मदत घेत आहे. चीनला अफगाणिस्तानात पायाभूत सुविधा उभारायच्या आहेत. त्यासाठी अफगाणिस्तानला ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’मध्ये (बीआरआय) मध्ये सहभागी करुन घेण्यासाठी चीन प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून चीनला भारताचा दक्षिण आशियातील प्रभाव कमी करायचा आहे. म्हणूनच चीन अफगाणिस्तानात आपली पाळेमुळे घट्ट करण्यासाठी धडपडत असल्याचा दावा अमेरिकी वेबसाईटने केला आहे.

पाकिस्तानचे नेतृत्व चीनला उघुरवंशियांच्या मुद्यावरही सहाय्य करीत आहे. तालिबान उघुर संघटनांना मदत करणार नाही, असे आश्वासन चीनने पाकिस्तानच्या माध्यमातून मिळविल्याचे संकेतही देण्यात येत आहेत. भारताला असणारा विरोध व वाद हा चीन-पाकिस्तानमधील वाढत्या सहकार्याचा आधार आहे, असा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभागातील माजी अधिकारी विक्रम सिंग यांनी केला आहे.

दरम्यान, पाकिस्तानकडून अमेरिका व तालिबानमधील शांतीकरार आणि अफगाणिस्तान-तालिबानमधील शांतीचर्चा उधळून लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. इतकेच नाही तर अफगाणिस्तानात वाढत असलेल्या हिंसाचारामागे पाकिस्तानच असल्याचा ठपका युरोपच्या अभ्यासगटाने ठेवला होता. अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार सत्तेवर आल्यावर भारताचा इथला प्रभाव कमी होईल, असे पाकिस्तानला वाटत आहे, असेही या अभ्यासगटाने म्हटले होते. आता पाकिस्तान चीनच्या मदतीने अफगाणिस्तानात भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी धडपडत असल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply