पंजाबमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, पाच दहशतवादी ठार

तरनतारन – पाकिस्तान सीमेवरून भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना सीमा सुरक्षादलाच्या जवानांनी ठार करण्यात यश मिळविले. पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील भिखविंड भागातून घुसखोरी सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून एके-४७ आणि दोन पिस्तुल्स जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

bsf-Punjabबीएसएफच्या ‘१०३ बटालियन’चे जवान भिखविंड विभागातील दल गावाजवळ आंतरराष्ट्रीय सीमेवर गस्त घालत असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर सीमासुरक्षा दलाच्या जवानांनी घुसखोरांना शरण येण्यास सांगितले. मात्र त्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. सीमासुरक्षा दलाच्या जवानांनी देखील त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. यावेळी उडालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.

सीमासुरक्षा दलाने ट्विट करत ही माहिती दिली. पहाटे पावणेपाचच्या सुमारास वाजता ही कारवाई करण्यात आली. या चकमकीनंतर दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. या संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला असून शोधमोहीम राबवण्यात आली आहे. घटनास्थळावरून एके ४७ व दोन पिस्तुल्स जप्त करण्यात आली.

पाकिस्तान पंजाबमार्गे भारतात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी करीत असून त्यासाठी विघटनवादी तसेच दहशतवादी संघटनांची मदत घेण्यात येते. काश्मीर मुद्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडलेल्या पाकिस्तानकडून भारतात अस्थिरता पसरवण्यासाठी या कारवाया करण्यात येत आहेत. पंजाबमधील दहशतवाद पुन्हा जिवंत करण्याचा डाव पाकिस्तान आखत असल्याचेही नुकतेच समोर आले होते.

पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय ‘शीख फॉर जस्टिस’ सारख्या (एसएफजे) गटांच्या माध्यमातून खलिस्तानचा मुद्दा उकरण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही समोर आले आहे. गेल्याच महिन्यात खलिस्तानी संघटनांशी संबंधित नऊ जणांना ‘युएपीए’ कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले होते. त्यानंतर आता सरकारने शीख फॉर जस्टिस (एसएफजे) या बंदी घातलेल्या संघटनेच्या ४० वेबसाईट्सवर बंदी घातली आहे.

leave a reply