तैवानच्या मुद्यावरील ऑस्ट्रेलियाच्या चिथावणीखोर कारवाया चीनबरोबरील संबंधांसाठी घातक ठरतील

- चिनी माध्यमांनी ऑस्ट्रेलियाला धमकावले

तैपेई/कॅनबेरा/बीजिंग – तैवान मुद्यावरून सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या चिथावणीखोर कारवायांमुळे चीन व ऑस्ट्रेलियामधील द्विपक्षीय संबंध संकटात येऊ शकतात, अशी धमकी चिनी प्रसारमाध्यमांनी दिली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ऍबॉट यांनी नुकतीच तैवानला भेट दिली. या भेटीत, त्यांनी चीनच्या आक्रमक कारवायांवर तीव्र टीका करीत सध्या तैवानच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचा इशारा दिला. या भेटीने अस्वस्थ झालेल्या चिनी माध्यमांनी ऑस्ट्रेलियाविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

तैवानच्या मुद्यावरील ऑस्ट्रेलियाच्या चिथावणीखोर कारवाया चीनबरोबरील संबंधांसाठी घातक ठरतील - चिनी माध्यमांनी ऑस्ट्रेलियाला धमकावलेया महिन्याच्या पहिल्या चार दिवसात, चीनच्या सुमारे दीडशे विमानांनी तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’मध्ये (एडीआयझेड) घुसखोरी केली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी घुसखोरी ठरली आहे. चीनच्या या कारवायांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी तैवानला भेट देऊन चीनवर केलेली टीका त्याचाच भाग ठरतो. ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ऍबॉट यांनी, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांची भेट घेतली. तसेच तैवानमधील एका अभ्यासगटालाही संबोधित केले. यात त्यांनी चीनवर जबरदस्त टीकास्त्र सोडले. तैवानच्या मुद्यावर चीन अत्यंत आक्रस्ताळी भूमिका घेऊन कारवाई करू शकतो, असा इशारा ऍबॉट यांनी यावेळी दिला. तैवानच्या मुद्यावरून ऑस्ट्रेलिया युद्धाचे नगारे वाजवित नसून चीनचीच धोरणे त्या स्वरुपाची असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी केला. चीनने आपल्या आक्रमतेपासून माघार घेऊन फेरविचार करण्याची गरज आहे, असा टोलाही ऍबॉट यांनी लगावला.

तैवानच्या मुद्यावरील ऑस्ट्रेलियाच्या चिथावणीखोर कारवाया चीनबरोबरील संबंधांसाठी घातक ठरतील - चिनी माध्यमांनी ऑस्ट्रेलियाला धमकावलेअमेरिका तसेच ऑस्ट्रेलियाकडून तैवानबाबत घेण्यात येणार्‍या भूमिकेचेही त्यांनी समर्थन केले. त्याचवेळी आता तैवानला सर्वात जास्त समर्थनाची गरज असल्याचेही माजी पंतप्रधान म्हणाले. तैवानवर दडपण टाकणार्‍या चीनला ‘टीपीपी’सारख्या करारात स्थान देता येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. दोन वर्षांपूर्वी आपण तैवानला भेट देण्याचा विचारही केला नसता, मात्र आता परिस्थिती बदलली असल्याचेही ऍबॉट म्हणाले.

ऍबॉट यांनी तैवानच्या मुद्यावर घेतलेल्या उघड भूमिकेमुळे चीन अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने थेट द्विपक्षीय संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. तैवानच्या मुद्यावरून ऑस्ट्रेलिया चीनशी उघड संघर्षाची भूमिका घेण्याची तयारी करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तैवानच्या मुद्यावर ऑस्ट्रेलियाने आपली बेदरकार भूमिका कायम ठेवली तर ऑस्ट्रेलियाला त्याचे जबरदस्त धक्के सहन करावे लागतील, असा इशारा चिनी मुखपत्राने दिला आहे.

leave a reply