इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शांतीसाठी ऑस्ट्रेलिया लष्करी तळ अद्ययावत करणार

लष्करी तळमेलबर्न – ‘इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील शेजारी आणि मित्रदेशांना सहाय्यक म्हणून ऑस्ट्रेलिया चार लष्करी तळांचे अद्ययावतीकरण करणार आहे. यासाठी ऑस्ट्रेलिया ७४ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करीत आहे’, अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केली. तसेच ही गुंतवणूक इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या शांततेसाठी असून चीनविरोधी नसल्याचे पंतप्रधान मॉरिसन यांनी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाच्या अंतर्गतसुरक्षा मंत्र्यांनी काही तासांपूर्वीच युद्धाचे नगारे स्पष्टपणे कानावर येत असल्याचे सांगून चीनविरोधी संघर्षाचा इशारा दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर, ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या या घोषणेकडे पाहिले जाते.

गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियाचे नेते चीनबरोबर युद्ध पेटणार असल्याचे संकेत देत आहेत. तैवानच्या मुद्यावरुन किंवा साऊथ चायना सीच्या वादावरुन चीनबरोबर संघर्षाची शक्यता बळावल्याचे दावे ऑस्ट्रेलियन नेते करीत आहेत. तर चीनच्या विनाशिकांच्या ऑस्ट्रेलियाच्या सागरी क्षेत्राजवळील हालचाली देखील वाढल्या होत्या. अशा परिस्थितीत, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी बुधवारी उत्तरेकडील चार लष्करी तळांच्या अद्ययावतीकरणाची घोषणा केली.

रॉबर्टसन बॅरेक्स, कांगारू फ्लॅट्स, माऊंट बंडे आणि ब्रॅडशॉ या चार लष्करी तळांचा विस्तार तसेच आधुनिकीकरण केले जाईल. यासाठी ऑस्ट्रेलिया ७४ कोटी डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करणार असून या भागात अमेरिकेबरोबर युद्धसरावाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती पंतप्रधान मॉरिसन यांनी केली. याशिवाय ऑस्ट्रेलिया पुढच्या दशकभरात आपल्या संरक्षणसज्जतेवर २७० अब्ज डॉलर्स खर्च करणार असल्याचेही मॉरिसन म्हणाले.

स्वातंत्र्याला अनुकूल असलेली जागतिक व्यवस्था तसेच शांतता आणि स्थैर्य व मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी ऑस्ट्रेलिया ही गुंतवणूक करीत असल्याचे पंतप्रधान मॉरिसन म्हणाले. तसेच या गुंतवणुकीमुळे ऑस्ट्रेलियन जनतेसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ऑस्ट्रेलियाची ही लष्करी गुंतवणूक कुठल्याही देशाच्या विरोधात नसल्याचे पंतप्रधान मॉरिसन यांनी ठासून सांगितले.

leave a reply