तैवानबाबतची ऑस्ट्रेलियाची वक्तव्ये बेजबाबदार व चिथावणी देणारी

- चीनच्या लष्कराचा इशारा

बीजिंग/कॅनबेरा – तैवानच्या मुद्यावर ऑस्ट्रेलियाकडून करण्यात येणार्‍या हालचाली व वक्तव्ये बेजबाबदार तसेच चिथावणी देणारी आहेत, असा इशारा चीनच्या लष्कराने दिला. चीन-तैवान युद्धाच्या धोक्याबाबत ऑस्ट्रेलियाने घेतलेली भूमिका अतिशयोक्तीची असल्याचा आरोपही चीनने केला आहे. चीनकडून तैवान प्रकरणी ऑस्ट्रेलियाला धमकावण्याची गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी वेळ आहे. चीनकडून आक्रमक इशारे दिले जात असतानाच, ऑस्ट्रेलियाने डार्विन पोर्टसाठी चिनी कंपनीबरोबर झालेल्या कराराचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.

तैवानबाबतची ऑस्ट्रेलियाची वक्तव्ये बेजबाबदार व चिथावणी देणारी - चीनच्या लष्कराचा इशाराचीनची कम्युनिस्ट राजवट गेल्या वर्षभरात अधिक आक्रमक झाली असून आपले विस्तारवादी धोरण राबविण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. तैवानवर ताबा मिळविणे यातीलच पुढील टप्पा असून कम्युनिस्ट पार्टीचे नेते तसेच लष्करी अधिकार्‍यांनी तैवानवरील हल्ल्याची योजना तयार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. अमेरिकेतील सत्ताबदलानंतर तैवानच्या हद्दीत वाढलेल्या घुसखोरीच्या घटनाही चीनच्या इराद्यांची जाणीव करून देणार्‍या ठरतात. ऑस्ट्रेलियातील राजकीय तसेच लष्करी वर्तुळात याचे पडसाद उमटले असून चीन-तैवान युद्धाची शक्यता वाढल्याचे संकेत नेत्यांकडून देण्यात येत आहेत.

गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री पीटर डटन यांनी, चीन व तैवानमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे बजावले होते. तर गृह विभागाचे सचिव असणार्‍या मायकल पेझुलो यांनी, जवळच्या भागातून मोठ्या आवाजात युद्धाचे नगारे वाजण्यास सुरुवात झाली आहे, अशा शब्दात चीन-तैवान युद्धाची शक्यता वर्तविली होती. ऑस्ट्रेलियातील काही अधिकारी व नेत्यांनी तैवानच्या क्षेत्रात संघर्ष भडकल्यास ऑस्ट्रेलियाने अमेरिकी लष्कराला सहाय्य करावे, अशी भूमिकाही मांडली होती. गेल्या काही महिन्यात ऑस्ट्रेलियाने अमेरिकेबरोबर संरक्षणसहकार्य वाढवितानाच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील नौदलाच्या हालचालीही वाढविल्या होत्या.तैवानबाबतची ऑस्ट्रेलियाची वक्तव्ये बेजबाबदार व चिथावणी देणारी - चीनच्या लष्कराचा इशारा

या सर्व घटनाक्रमावर चीनच्या लष्कराकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली आहे. ‘तैवानच्या मुद्यावर ऑस्ट्रेलियाकडून सुरू असणार्‍या हालचाली चिथावणीखोर असून त्याला आमचा तीव्र विरोध आहे. तैवान मुद्यावर ऑस्ट्रेलिया संघर्ष भडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. चीन-तैवान युद्धाच्या धोक्याबाबत ऑस्ट्रेलियाने घेतलेली भूमिकाही अतिशयोक्त आहे’, असे चीनच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल तान केफेई यांनी बजावले. ऑस्ट्रलियातील काही व्यक्तींकडून चीन-तैवान युद्धाबाबत केली जाणारी वक्तव्ये बेजबाबदार असल्याचा आरोपही चिनी लष्कराच्या प्रवक्त्यांनी केला.

चीनकडून तैवानच्या मुद्यावर सुरू असलेल्या आक्रमक लष्करी हालचालींचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटत आहेत. तैवानला या मुद्यावर मोठ्या प्रमाणात समर्थन मिळू लागले आहे. त्याचवेळी अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपानपाठोपाठ युरोपिय देशही तैवान मुद्यावर आग्रही भूमिका घेऊ लागले आहेत. ही बाब चीनला अस्वस्थ करणारी ठरली असून चिनी राजवट धमक्या तसेच इशारे देऊन या देशांवर दडपण आणण्याचे प्रयत्न करीत आहे.

गेल्याच महिन्यात चीनने ऑस्ट्रेलियाला धमकावताना, व्यापारयुद्ध थांबवायचे असेल, तर तैवान प्रकरणात चीनच्या धोरणाला पाठिंबा द्या, असे बजावले होते. त्यापाठोपाठ तैवानप्रकरणी ऑस्ट्रेलियाने अमेरिकेच्या लष्कराला सहाय्य केल्यास चीन ऑस्ट्रेलियातील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविल, अशी धमकी चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने दिली होती.तैवानबाबतची ऑस्ट्रेलियाची वक्तव्ये बेजबाबदार व चिथावणी देणारी - चीनच्या लष्कराचा इशारा

दरम्यान, चीनकडून इशारे व धमक्या मिळत असतानाही ऑस्ट्रेलियाने आपण आपल्या धोरणांवर ठाम राहण्याचे संकेत दिले आहेत. ऑस्ट्रेलियन यंत्रणांनी ‘डार्विन पोर्ट’साठी चीनच्या ‘लँडब्रिज ग्रुप’बरोबर झालेल्या कराराची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

2015 साली याबाबत करार झाला होता. मात्र या बंदराजवळ अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा संयुक्त संरक्षणतळ असून, हा करार वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. अमेरिकी नेतृत्त्वाने सदर करारावर तीव्र आक्षेप नोंदविले होते. या पार्श्‍वभूमीवर करारावर फेरविाराचा निर्णय ऑस्ट्रेलिया व चीनमधील तणाव अधिकच चिघळवणारा ठरेल, असे स्पष्टपणे दिसत आहे.

leave a reply