भारताला पाकिस्तानच्या ड्रोन युद्धाची जाणीव आहे

- वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांचा दावा

नवी दिल्ली – पाकिस्तानने छेडलेल्या ड्रोन युद्धाची आपल्याला पूर्णपणे कल्पना आहे, असे भारतीय लष्कराने बजावले. ‘ड्रोन्स रस्त्यावर तयार करता येत नाहीत. ड्रोन्सचे तंत्रज्ञान आणि त्यामागे असलेला एका देशाचा हात व दहशतवादी संघटनांचा यातील सहभाग, या सार्‍याची भारतीय लष्कराला पूर्णपणे जाणीव आहे’, असे भारतीय लष्कराच्या 15 कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल डीपी पांडे यांनी म्हटले आहे. एकाच दिवसापूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी जम्मूमधील वायुसेनेच्या तळावर झालेल्या घातपातामागे पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे म्हटले होते.

भारताला पाकिस्तानच्या ड्रोन युद्धाची जाणीव आहे - वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांचा दावारविवारी वायुसेनेच्या जम्मूमधील तळावर ड्रोन्सद्वारे दोन स्फोट घडविण्यात आले होते. हे दोन्ही स्फोट कमी तीव्रतेचे होते. यात वायुसेनेचे नुकसान झालेले नाही. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या तळावरील ड्रोन्सची घुसखोरी म्हणजे सुरक्षा दलांसाठी इशाराघंटा ठरते, असे दावे केले जातात. या स्फोटाचा तपास सुरू असून याबाबतची अधिक माहिती उघड करता येणार नाही, असे लेफ्टनंट जनरल पांडे यांनी स्पष्ट केले. पण असे असले तरी या ड्रोन युद्धामागे कोण आहे, याची भारतीय लष्करला पुरेपूर जाणीव असल्याचा इशारा ले. जनरल पांडे यांनी दिला.

ड्रोन किंवा ड्रोन युद्धाचा एखाद्या देशाकडून केला जाणारा वापर, त्याच्या मागे असलेली सपोर्ट सिस्टीम, याबाब भारतीय लष्कराला माहिती आहे. इतकेच तर ड्रोन्समध्ये घातपात घडविण्यासाठी करावे लागणारे फेरबदल स्थानिक पातळीवरही घडविता येऊ शकतात, हे देखील भारतीय लष्कराला ठाऊक आहे. त्याचवेळी अशा घातपातासाठी देशाकडून प्रशिक्षण व इतर प्रकारचे सहाय्य पुरविले जाऊ शकते, याचीही भारतीय लष्कराला कल्पना असल्याचे ले. जनरल पांडे यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या या विधानातून भारतीय लष्कराने पाकिस्तानमार्फत घडविण्यात आलेल्या या घातपाताची गंभीर दखल घेतल्याचे संकेत मिळत आहेत. माजी लष्करी अधिकारी देखील वायुसेनेच्या तळावर ड्रोनद्वारे स्फोट घडवून पाकिस्तानने फार मोठी चूक केल्याचे बजावले आहे. हा घातपात घडवून पाकिस्तानने फार मोठी कल्पकता दाखविली खरी. पण याच्या परिणामांचा पुरता विचार पाकिस्तानने केलेला नाही. काश्मीरमधील दहशतवाद्यांकडे असा घातपात घडविण्याचे तंत्र असू शकते, असे पाकिस्तानचे पत्रकार सांगत आहेत. पण असेच तंत्रज्ञान यापुढे बलोचिस्तानातील बंडखोरांकडेही येऊ शकते, याची जाणीव माजी लष्करी अधिकारी करून देत आहेत.

इतकेच नाही तर पुढच्या काळात पाकिस्तानात मुक्तपणे वावरणार्‍या दहशतवाद्यांनाही ड्रोन हल्ल्याद्वारे टार्गेट केले जाऊ शकते, याकडे भारताचे माजी लष्करी अधिकारी लक्ष वेधत आहेत.

काही दिवसांपूर्वी भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत व लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी पाकिस्तान भारतात ड्रोनद्वारे शस्त्रे व अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचा ठपका ठेवला होता. यामुळे काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील संघर्षबंदीला अर्थ उरत नाही, असे जनरल रावत यांनी बजावले होते. पण आता घातपातासाठी ड्रोनचा वापर करून पाकिस्तानने फार मोठी चूक केली आहे व भारतीय लष्कर पाकिस्तानला याचे उत्तर दिल्यावाचून राहणार नाही, असे विश्‍लेषक बजावत आहेत.

leave a reply