बेलारुस निर्वासितांचा ‘लिव्हिंग वेपन’ म्हणून वापर करीत आहे

- पोलंडचा आरोप

वॉर्सा/मिन्स्क – ऑलिंपिक स्पर्धेतील खेळाडूला आश्रय दिल्याचा सूड उगविण्यासाठी बेलारुस निर्वासितांचा जिवंत शस्त्रासारखा वापर करून त्यांना पोलंडमध्ये घुसवित आहे, असा खळबळजनक आरोप पोलंडने केला आहे. निर्वासितांच्या माध्यमातून बेलारुस युरोपिय महासंघाविरोधात ‘हायब्रिड वॉर’ खेळत असल्याचा इशाराही यावेळी पोलंडने दिला. पोलंडच्या आधी लिथुआनियानेही बेलारुसवर निर्वासितांच्या घुसखोरीबाबत गंभीर आरोप केले होते. पोलंड व लिथुआनियाने यासंदर्भात संयुक्त निवेदन जारी केले असून, युरोपिय महासंघाने याबाबत ठोस कारवाई करावी, अशी आग्रही मागणी केली आहे.

बेलारुस निर्वासितांचा ‘लिव्हिंग वेपन’ म्हणून वापर करीत आहे - पोलंडचा आरोपकाही दिवसांपूर्वी टोकिओ ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रिस्तसिना त्सिमानोस्काया या बेलारुसच्या महिला धावपटूने पोलंडच्या दूतावासात प्रवेश करून खळबळ उडवली होती. या घटनेनंतर पोलंड सरकारने क्रिस्तसिनाला मानवतावादी भूमिकेतून आश्रय देण्याचा निर्णय घेतला होता. या घटनेवर बेलारुसने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. सदर घटनेनंतर बेलारुस-पोलंड सीमेवरील निर्वासितांचे लोंढे वाढण्यास सुरुवात झाल्याचा दावा पोलंडकडून करण्यात आला आहे.

धावपटूला आश्रय दिल्यानंतरच्या दोन दिवसात बेलारुस सीमेवरून तब्बल १३३ निर्वासितांनी पोलंडमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरात या सीमेवरून अवघे १२२ निर्वासित आले होते. ही बाब लक्षात घेता दोन दिवसात दाखल झालेले १३३ निर्वासित गंभीर गोष्ट ठरल्याकडे पोलंडने लक्ष वेधले आहे. ‘बेकायदा निर्वासितांच्या माध्यमातून बेलारुसची राजवट युरोपिय महासंघाविरोधात हायब्रिड वॉर खेळत आहे. बेलारुसमधून दाखल होणार्‍या निर्वासितांमध्ये लहान मुले, महिला व तरुणांचा समावेश आहे. बेलारुस या निर्वासितांचा वापर जिवंत शस्त्रासारखा करीत आहे’, असा खरमरीत आरोप पोलंडचे अंतर्गत सुरक्षा उपमंत्री मॅसिज वासिक यांनी केला.

बेलारुस निर्वासितांचा ‘लिव्हिंग वेपन’ म्हणून वापर करीत आहे - पोलंडचा आरोपपोलंड व लिथुआनिया सरकारकडून या मुद्यावर संयुक्त निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले आहे. ‘बेलारुसची लुकाशेन्को राजवट बेकायदा निर्वासितांचा शस्त्रासारखा वापर करीत आहे. युरोपिय महासंघ व सदस्य देशांवर राजकीय दडपण आणण्याचा उद्देश यामागे आहे’, असे संयुक्त निवेदनात बजावण्यात आले आहे. त्याचवेळी युरोपिय महासंघाने याबाबत तातडीची बैठक आयोजित करून कारवाईसाठी पावले उचलावीत अशी मागणीही दोन्ही देशांनी केली आहे.

युरोपिय महासंघाने बेलारुसवर लादलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर देण्यासाठी निर्वासितांच्या लोंढ्याचा वापर करण्यात येत असल्याचा दावा लिथुआनियाने केला आहे. रशिया व बेलारुस हे संगनमताने निर्वासितांची तस्करी करणार्‍या गुन्हेगारी टोळ्यांना सहकार्य करीत असल्याचा आरोपही केला आहे. निर्वासितांचे हे लोंढे रोखण्यासाठी लिथुआनियाने सीमेवर नवे कुंपण उभारण्यास सुरुवात केली असून अतिरिक्त सुरक्षादलेही तैनात केली आहेत.

गेल्या महिन्यात महासंघाचा आघाडीचा सदस्य देश असणार्‍या ऑस्ट्रियानेही या मुद्यावर महासंघाचे लक्ष वेधले होते. ‘बेलारुससारखे देश निर्वासितांचा वापर युरोपिय महासंघाविरोधात शस्त्रासारखा करु पहात आहेत. महासंघाने याची जाणीव ठेऊन पुढील पावले उचलायला हवीत. महासंघ व युरोपिय कमिशनने या मुद्यावर जागे होण्याची गरज आहे. महासंघ व संबंधित यंत्रणांनी आर्थिक, राजकीय अथवा व्यापारी पातळीवर जी कारवाई शक्य आहे, ती करण्यासाठी हालचाली सुरू करायला हव्यात’, अशी मागणी ऑस्ट्रियाचे परराष्ट्रमंत्री अलेक्झांडर शॉलनबर्ग यांनी केली होती.

leave a reply