विमानाचे महत्त्वाचे भाग तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे ‘बीटा टायटॅनियम’ डीआरडीओकडून विकसित

- संरक्षणमंत्र्यांकडून अभिनंदन

नवी दिल्ली – विमानात अतिसंवेदनशील व अतिमहत्वाच्या भाग तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा उच्च क्षमतेचा मेटास्टेबल बीटा टायटॅनियम मिश्रधातू ‘डीआरडीओ’ने विकसित केला आहे. संपूर्णत: स्वदेशी तंत्रज्ञानामुळे विमानातील महत्त्वाच्या भागांचे उत्पादन घेण्यासाठी या धातूचा औद्योगिक पातळीवर वापर करता येईल. तसेच या धातूमुळे विमानाचे वजन कमी करता येईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. भारताने स्वदेशी बनावटीची हलक्या वजनाची तेजस लढाऊ विमाने विकसित केली आहेत. त्याच्या पुढील आवृत्तीही लवकरच संरक्षणदलांमध्ये दाखल होईल. भारताच्या या विमानविकास कार्यक्रमालाही या संशोधनामुळे बळ मिळणार आहे.

विमानाचे महत्त्वाचे भाग तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे ‘बीटा टायटॅनियम’ डीआरडीओकडून विकसित - संरक्षणमंत्र्यांकडून अभिनंदनसंरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेला उच्च क्षमतेचा मेटास्टेबल बीटा टायटॅनियम मिश्रधातू हा व्हनेडीयम, लोखंड आणि अ‍ॅल्युमिनियमच्या विशिष्ट मिश्रणातून तयार करण्यात आला आहे. औद्योगिक पातळीवर त्याचे नामकरण ‘टीआय-10व्ही-2एफइ-3ए1’ असे करण्यात आले आहे. विमानाच्या भागांच्या निर्मितीसाठी पारंपारीक पद्धतीने वापरला जाणार्‍या ‘एनआय-सीआर-एमओ’ या पोलादाऐवजी आता या मिश्रधातूचा वापर करता येईल. हा धातूचे वजन हलके असून त्याची क्षमता अधिक आहे. हा धातू गंजरोधक असून अभंग आहे. तसेच त्याच्या निर्मितीचा खर्चही कमी आहे.

त्यामुळे विमानात मिश्रधातूंपासून बनणार्‍या फ्लॅप ट्रॅक, लँडींग गियर, ड्रॉप लिंक यासारख्या विविध सुट्या भागाची निर्मितीसाठी हा मिश्रधातून वापरण्यात येणार असून यामुळे विमानाचे वजन कमी करता येणार आहे. लढाऊ विमानासाठी हा शोध अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. तसेच मोठ्या प्रमाणावर खर्चही कमी होणार आहे. उच्च क्षमतेचा या मेटास्टेबल बीटा टायटॅनियम मिश्रधातूच्या निर्मितीसाठी डीआरडीओच्या संशोधकांनी प्रचंड मेहनत घेतली असून कच्च्या मालाची निवड, त्याच्या प्रक्रियेवर व इतर तांत्रिकबाबीवर सखोल संशोधन करण्यात आले. तसेच हा धातू तपासून पाहण्यासाठी विविध संस्थांनी काम केले आहे, अशी माहितीही केंद्रीय संरक्षणमंत्रालयाने दिली आहे. बंगळुरूमधील हिंदुस्थान एरोनॉटिक्सकडून (हल) तयार करण्यात आलेल्या विमानात या धातूचा वापर करून यशस्वी चाचण्या करण्यात आल्या आहेत, असे संरक्षणमंत्रालयाने अधोरेखित केले आहे.

डीआरडीओच्या हैदराबाद येथील संरक्षण धातूविषयक प्रयोगशाळेत (डीएमआरएल) हा बीटा टायटॅनियम मिश्रधातू विकसित करण्यात आला आहे. ‘एरॉनॉटिकल डेव्हल्पमेंट एजन्सी’ने (एडीए) विमानाच्या 15 सुट्ट्या भागांच्या निर्मितीसाठी या धातूचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या सुट्ट्या भागांचे वजन किमान 40 टक्क्यांनी घटेल, असा दावा करण्यात येतो. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या यशाबद्दल डीआरडीओच्या संशोधकांचे अभिनंदन केले आहे. तसेच डीआरडीओचे प्रमुख डॉ. जी. सतिश रेड्डी यांनीही या धातूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या संशोधकांची प्रशंसा केली आहे.

दरम्यान, मे महिन्यात डीआरडीओने स्वदेशी बनावटीच्या एरोइंजिनाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे संशोधन करण्यात आल्याची घोषणा केली होती. डीआरडीओने एरोइंजिनासाठी आवश्यक असणारे निअर आयसोथर्मल फॉर्जिंग तंत्रज्ञान विकसित केले होते. या तंत्रज्ञानामुळे टायटॅनियम मिश्रणापासून ‘हाय-प्रेशर कॉप्रेसर’ (एचपीसी) डिस्कची निर्मिती करता येते. ही डिस्क एरोइंजिनचा अतिशय महत्त्वाचा भाग असते.

leave a reply