एअरटेल, रिलायन्स जीओकडून ५जी चाचण्यांना सुरूवात – २०२६ पर्यंत भारतात ५जीचे ३३ कोटी ग्राहक असण्याचा अंदाज

नवी दिल्ली – एअरटेल आणि रिलायन्स जीओकडून देशात ५जी चाचण्यांना सुरूवात करण्यात आली आहे. एअरटेलकडून मंगळवापासून, तर जीओने बुधवारपासून या चाचण्या सुरू केल्या. त्याचवेळी भारतात पुढील काळात ५जीचे ग्राहक किती वेगाने वाढतील, याचा अंदाज वर्तविणारा लक्षवेदी अहवालही प्रसिद्ध झाला आहे. यानुसार २०२६पर्यंत भारतात ५जी वापरणारे ३३ कोटी ग्राहक असतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच प्रति स्मार्टफोन डाटाचा वापर ४० जीबीपर्यंत पोहोचलेला असेल, असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यात दूरसंचार मंत्रालयाने देशातील चार कंपन्यांना ५जी तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेण्याची परवानगी दिली होती. तसेच सहा महिन्याच्या आत या चाचण्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये चाचण्यांसाठी आवश्यक उपकरणांची खरेदी व ते बसविण्यासाठीचा दोन महिन्यांचा वेळही अंतर्भूत होता. दूरसंचार मंत्रालयाने ५जी चाचण्यांना परवानगी दिलेल्याला दहा दिवसांपूर्वीच दोन महिने पुर्ण झाले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर भारतातील टेलिकॉम कंपन्यांकडून चाचण्या सुरुवात झाल्याचे दिसत आहे. सायबर हब म्हणून विख्यात असलेल्या गुरुग्राममधून एअरटेलने मंगळवारपासून ५जीच्या चाचण्या सुरू केल्या. ३.५ गिगाहर्टज-जीएच बँण्डवर या चाचण्यांना सुरुवात झाली आहे. यासंदर्भात एक व्हिडीओही एअरटेलने पोस्ट केला होता. यानुसार चाचणीदरम्यान १०००एमबीपीएसचा (१जीबीपीएस) डाऊनलोड वेग मिळत आहे. तर १०० एमबीपीएसचा अपलोड वेग मिळत आहे.

तर रिलायन्स जीओने बुधवारपासून मुंबईत ५जी चाचण्यांना सुरुवात केली. एमएमव्हेव बॅण्डचा वापर जीओच्या ५जी चाचणीसाठी होत आहे. लवकरच सॅमसंग, नोकिया, एरिक्सन या कंपन्यांच्या सहाय्याने देशात इतरत्रही जीओकडून ५जी चाचण्या सुरू होतील. नुकतेच दूरसंचार मंत्रालयाने ७००एमएच, ३.५जीएच आणि २६जीएच हे स्पेक्ट्रम ५जी चाचण्यासाठी उपलब्ध करून दिले होेते. एअरटेल आणि जीओव्यतिरिक्त वोडाफोन आयडीया आणि महानगर टेलिफाने निगम लिमिटेडला (एमटीएनएल) ५जी चाचण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या कंपन्याही लवकरच चाचण्या सुरू करतील असा अंदाज आहे. ५जी चाचण्यांपासून चिनी कंपन्यांना दूर ठेवल्याने चीनचा आधीच तिळपापड झाला आहे. हा निर्णय निराशाजनक असल्याची प्रतिक्रियाही चीनने दिली होती.

दरम्यान, भारतात २०२६ च्या अखरीपर्यंत ३३ कोटी ग्राहक ५जी सेवा वापरत असतील. थोडक्यात देेशाच्या लोकसंख्येचा २६ टक्के नागरिक ही सेवा वापरत असतील. यातील ४२ टक्के ग्राहक मोठ्या शहरातील असतील, असा अंदाज एरिक्सन मोबीलिटीने व्यक्त केला आहे. तसेच देशात प्रति स्मार्ट फोन डाटा युजेसही वाढलेला असेल, असे या अहवालात म्हटले आहे. २०२६ सालापर्यंत प्रति स्मार्टफोन डाटा युजेस ४०जीबीपर्यंत जाईल. सध्या २०२० मध्ये हा डाटा वापर १५ जीबी प्रतीस्मार्टफोन पोहोचला होता, तर २०१९ सालामध्ये हेच प्रमाण १३ जीबी इतके होते.

leave a reply