विस्तारवादी चीनला भूतानने स्पष्ट शब्दात खडसावले

नवी दिल्ली – भूतानच्या साकतेंग अभयारण्यावर आपलाच अधिकार असल्याचा अजब दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. त्याचबरोबर सदर वादात त्रयस्थ देशाने पडू नये, असे सांगून चीनने भारताला लक्ष्य केले. मात्र, साकतेंग अभयारण्यावर आपला सार्वभौम अधिकार असल्याचे सांगून भूतानने चीनचा दावा फेटाळला. दरम्यान, चीन दावा करत असलेला भूतानचा भूभाग भारताच्या अरुणाचल प्रदेशच्या सीमेला खेटून आहे. त्यामुळे भूतानच्या भूभागावर दावा ठोकून चीन भारताच्या इशान्येकडील भागात नवी आघाडी उघडण्याची तयारी करीत असल्याचे दिसत आहे.

Bhutan-China‘भूतानच्या पूर्व, पश्चिम आणि मध्य भागावर चीनचा अधिकार आहे. यापैकी भूतानच्या पूर्वेकडील साकतेंग अभयारण्य वादग्रस्त भूभाग असून गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये याबाबत चर्चाही सुरू आहे’, अशी घोषणा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. त्याचबरोबर चीन आणि भूतानमधील या सीमावादात इतर कुठल्याही देशाने नाक खुपसू नये, असे सांगून चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतावर निशाणा साधला. मात्र, चीन करीत असलेल्या या दाव्यावर भुतानने सडकून टीका केली आहे. गेल्या काही वर्षांपासून भूतान आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये वादग्रस्त भूभागावर चर्चा सुरू आहे. पण या चर्चांमध्ये कधीही साकतेंग अभयारण्याचा मुद्दा आला नव्हता. साकतेंग अभयारण्यावर भूतानचा सार्वभौम अधिकार असून यावरील चीनचा दावा खपवून घेणार नाही’, असे भूतानच्या सरकारने चीनला फटकारले.

भूतानच्या पुर्वेकडील साकतेंग अभयारण्य आणि भारताचा अरुणाचल प्रदेश या दोघांची सीमारेषा एकच आहे. त्यामुळे याआधी कधीही चर्चेत नसलेल्या साकतेंग अभयारण्याचा मुद्दा काढून चीन अरुणाचल प्रदेशवरील आपला दावा पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहे. भारताने चीनच्या कुटिल विस्तारवादावर हल्ला चढवल्यानंतर अस्वस्थ झालेल्या चीनने भूतानच्या सीमावादाचा प्रश्न उपस्थित करून अप्रत्यक्षरित्या भारताला आव्हान दिल्याचा दावा विश्लेषकांनी केला आहे. तर लडाखच्या सीमेवरून भारताबरोबर तणाव निर्माण झालेला असताना चीनने हा नवा वाद काढून भारतावर दडपण वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे या विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Bhutan-Chinaदरम्यान, चीनचा सुमारे १८ देशांबरोबर सीमावाद सुरू आहे. यामध्ये भारताबरोबर रशिया, जपान, तैवान, फिलीपाईन्स, व्हिएतनाम, मंगोलिया, नेपाळ, भूतान, म्यानमार, मलेशिया, इंडोनेशिया तुर्कमेनिस्तान या देशांचा समावेश आहे. गलवान व्हॅलीतील संघर्षात भारतीय लष्कराने चीनचा नक्शा उतरवल्यानंतर आणि भारतीय पंतप्रधानांनी चीनच्या विस्तारवादी धोरणावर मर्मभेदी प्रहार केनंतर आतापर्यंत चीनला बिचकून असणाऱ्या छोट्या शेजारी देशांनीही चीनला आव्हान देण्यास सुरूवाट केली आहे. भुतानने चीनचा कलेला निषेध याची साक्ष देत आहे. यामुळे बेचैनी वाढलेल्या चीन भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

leave a reply