बायडेन प्रशासनाकडून अफगाणी निर्वासितांसाठी अर्थसहाय्य जाहीर

बायडेनवॉशिंग्टन – तालिबानच्या हल्ल्यांमुळे बेघर झालेल्या अफगाणींच्या पुनर्वसनासाठी अमेरिकेने 10 कोटी डॉलर्सच्या सहाय्याची घोषणा केली. तालिबानचे अफगाणिस्तानातील हल्ले दोहा करारातील मर्यादांचे उल्लंघन ठरते. याविरोधात अमेरिका अफगाण सरकारच्या पाठिशी असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अफगाणी राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या चर्चेत स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून तालिबानने अमेरिकन लष्कराला सहाय्य करणारे दुभाषी, वाटाडी, सहाय्यक आणि त्यांच्या परिवाराला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या अफगाणी सहाय्यकांना सुरक्षित बाहेर काढून अमेरिकेत त्यांना आश्रय देण्याची तयारी बायडेन प्रशासनाने केली आहे. याअंतर्गत अफगाणी निर्वासितांना ‘स्पेशल इमिग्रेशन व्हिसाज्’ दिले जातील. अफगाणिस्तानातून आठ हजार लष्करी सहाय्यकांना हे विशेष व्हिसा देण्यात येईल. यापैकी 2,500 जणांना हे व्हिसा दिले आहेत. पण अमेरिकन लष्करासाठी सहाय्यकाची भूमिका बजावणारे अफगाणिस्तानात 18 हजाराहून अधिक असल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, तालिबानने गनी सरकारबरोबर संघर्षबंदी लागू करावी, अशी सूचना अमेरिका व युरोपिय महासंघाने केली आहे. पण राष्ट्राध्यक्ष गनी यांना सत्तेतून हटविल्याशिवाय संघर्षबंदी शक्य नसल्याचे तालिबानने म्हटले आहे.

leave a reply