चीनने कोरोनाच्या पारदर्शक चौकशीसाठी सहकार्य करावे – अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाचे आवाहन

वॉशिंग्टन – कोरोनाचा विषाणू चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच बाहेर पडला व जगभरात पसरला ही ‘लॅब लीक थिअरी’ आता बरेचजण मान्य करू लागले आहेत. तसे संकेत देणारे परिस्थितीजन्य पुरावे आढळत आहेत, ही बाब पाश्‍चिमात्य माध्यमांनीही स्वीकारली आहे. पण सर्वात आधी आपणच कोरोनाचा उल्लेख वुहान व्हायरस असा करून यामागे चीन असल्याचा आरोप केला होता, याची आठवण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यावेळी माझ्यावर घणाघाती टीका झाली, पण आता माझे म्हणणे सर्वांनी मान्य केले, त्यासाठी आभार, अशा खोचक शब्दात ट्रम्प यांनी आपल्या टीकाकारांना लक्ष्य केले. त्याचवेळी लॅब लीक प्रकरणात चीनने पारदर्शक चौकशीसाठी सहाय्य करावे, अशी मागणी अमेरिकेने अधिकृत पातळीवर केली आहे.

बायडेन प्रशासन2019 सालच्या नोव्हेंबर महिन्यातच वुहान प्रयोगशाळेत काम करणारे चीनचे संशोधक कोरोनाच्या संसर्गामुळे आजारी पडले होते. पण चीनने याची माहिती दडवून ठेवली. कोरोनाची साथ जगभरात पसरल्यानंतरही चीनने याबाबतची बरीच माहिती जगासमोर येऊ दिली नाही. उलट ही माहिती उघड करणारे संशोधक, डॉक्टर्स व पत्रकार चीनमध्ये बेपत्ता झाले आहेत. काही वर्तमानपत्रांनी याबाबतची माहिती उघड केली असून यामुळे ‘लॅब लीक’ अर्थात वुहानच्या प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा विषाणू जगभरात पसरला या दाव्याला पुष्टी मिळत आहे. त्याचवेळी याबाबत लपवाछपवी करणार्‍या चीनवरील संशयही वाढत चालला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर असताना सर्वात आधी कोरोनाचा उल्लेख वुहान व्हायरस असाच करून यासाठी चीन जबाबदार असल्याचे जगजाहीर केले होते. त्यावेळी अमेरिकन माध्यमांनी त्यांच्यावर सडकून टीका केली व हा आरोप त्यांच्या विद्वेषी धोरणाचा भाग असल्याचा ठपका ठेवला होता. त्याची आठवण ट्रम्प यांनी करून दिली. पण आत्ता मात्र मी केलेले दावे सर्वांनाच मान्य करावे लागत आहेत आणि ते मान्य केल्याबद्दल आभार, असा टोला लगावून ट्रम्प यांनी अमेरिकन माध्यमातील आपल्या टीकाकारांना लक्ष्य केले. कोरोनाच्या उगमावरून चीनवर व्यक्त केल्या जाणार्‍या संशयाची दखल चीनधार्जिणे अशी ख्याती असलेल्या बायडेन प्रशासनालाही घ्यावी लागली.

व्हाईट हाऊसचे कोरोनाविषयक सल्लागार अँडी स्लॅविट यांनी या प्रकरणी सखोल व पारदर्शक चौकशीची मागणी केली. या साथीच्या उगमाची सारी माहिती मिळविणे अनिवार्य बनले आहे. म्हणूनच चीन व जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत काही महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यायला हवी. या साथीच्या उगमाची पारदर्शक चौकशी करण्यासाठी चीन व जागतिक आरोग्य संघटनेने सहाय्य करावे व या प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी सहकार्य करावे. सध्या या दोघांकडूनही तसे सहकार्य केले जात नाही, असा ठपका स्लॅविट यांनी ठेवला आहे.

चीनला गंभीर प्रश्‍न विचारले असले तरी अजूनही बायडेन प्रशासनाने कोरोनाच्या साथीला जबाबदार असलेल्या चीनविरोधात अपेक्षित भूमिका स्वीकारलेली नाही, अशी टीका अमेरिकन विश्‍लेषक करीत आहेत. अमेरिकेत कोरोनाने सहा लाख जणांचा बळी घेतला आहे. असे असूनही राष्ट्राध्यक्ष बायडेन ही साथ पसरविणार्‍या चीनच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारण्याचे आपले कर्तव्य पार पाडण्यास तयार नाहीत, अशी टीका विख्यात विश्‍लेषक गॉर्डन चँग यांनी केली होती. या टीकेचा प्रभाव दिसू लागला आहे व बायडेन प्रशासनाबरोबरच अमेरिकेच्या माध्यमांनाही आता चीनच्या विरोधात भूमिका घेणे भाग पडू लागल्याचे दिसते.

दरम्यान, लॅब लीकच्या दाव्याला बळ देणार्‍या बातम्या व प्रतिक्रिया समोर येत असताना, चीन यामुळे कमालीचा अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. आपला प्रभाव वापरून चीन ही बाब दडपण्याचा शक्य तितका प्रयत्न करीत होता. पण आता हे प्रकरण दडपणे चीनच्या कुवतीबाहेरील बाब बनत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने वुहानचा दौरा करून दिलेल्या अहवाला दाखला दिला. कोरोनाचा उगम वुहानच्या प्रयोगशाळेत झालेला नाही, असा निर्वाळा या पथकाने दिला होता, याकडे लिजिआन यांनी लक्ष वेधले. मात्र हा वादग्रस्त निष्कर्ष या पथकातीलच काहीजणांना अमान्य होता, ही बाब जगासमोर येत आहे.

इतकेच नाही तर या पथकाला चीनने संपूर्ण सहकार्य केले नव्हते, ही बाब देखील आता उघड होत आहे. त्यामुळे याबाबत विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नांना तोंड देणे चीनसाठी अधिकाधिक अवघड बनत चालले आहे.

leave a reply