लॉकडाऊननंतर भारतीय कंपन्यांवरील सायबर हल्ल्यात मोठी वाढ

नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात भारतीय कंपन्यांवर सायबर हल्ले वाढले आहेत. देशातील १० पैकी ७ कंपन्यांना सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. शुक्रवारी डॉ. रेड्डीज् कंपनीवर सायबर हल्ला झाला. रशियाने कोरोनावर विकसित केलेल्या स्पुटनिक-५ या लसीच्या भारतात चाचण्या घेण्याची घोषणा या कंपनीकडून नुकतीच करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी भारत-युरोपीय युनियनमध्ये परराष्ट्र धोरण आणि सुरक्षाविषयक बैठक पार पडली. ह्या बैठकीतही सायबर सुरक्षेचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत होता.

सायबर हल्ले

कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे अचानक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कंपन्यांना आपली कार्यपध्दतीही बदलावी लागली. या बदलाला देशातील अनेक कंपन्याची तयारी नव्हती. बहुतांश कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगण्यात आले. आताही जेवढे शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्यात आले आहे. मात्र यामुळे कंपन्यांना सायबर हल्ल्यांचाही मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे.

कोरोनाचे संकट सुरु झाल्यावर कंपन्यांना आपली कार्यपद्धती बदल करावे लागल्यावर सायबर हल्ल्याचा धोका २५ टक्क्यांनी वाढला. या संकटाच्या सुरुवातीच्या काळात ७३ टक्के कंपन्यांना वाढलेल्या सायबर हल्ल्यांचा सामना करावा लागला, असा दावा ‘सिस्को’ या कंपनीने ‘फ्युचर ऑफ सिक्युअर रिमोट वर्क रिपोर्ट’मध्ये करण्यात आला आहे.

सायबर हल्ले

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात ६५ टक्के कंपन्या आणि संस्थांना सुरक्षित ऍक्सेसची समस्या आली. ६६ टक्के कंपन्यांना डाटा प्रायव्हसीच्या आणि ६२ टक्के कंपन्यांना मालवेअर सुरक्षेसंदर्भांतील आव्हानांचा सामना करावा लागला. कारण ‘वर्क फ्रॉम होम’ने सिस्टीममध्ये व्हायरस शिरण्याची आणि सायबर हल्लेखोरांकडून याचा गैरफायदा घेण्याची शक्यता वाढली देशातील बहुतांश कंपन्या ‘वर्क फ्रॉम होम’साठी तयार नव्हत्या आणि त्यांची सायबर सुरक्षेबाबतही तयारी नव्हती.

मात्र आता ६५ टक्के कंपन्यांनी सायबर सुरक्षेच्या दृष्टीने स्वतःला तयार केले आहे, असे ‘सिस्को’च्या सर्वेक्षणात समोर आले आहे. यामुळे कंपन्यांची सायबर सुरक्षेत गुंतवणूक वाढली आहे. ८४ टक्के कंपन्यांनी सायबर सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य असल्याचे म्हटले आहे. जगातील २१ देशात हे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये आशिया-प्रशांत क्षेत्रातील १३ देश आहेत. यामध्ये भारताचा समावेश होता.

leave a reply