आफ्रिकेच्या साहेल प्रांतासाठी ‘ब्लॅक संडे’ माली, बुर्कीना फासोतील दहशतवादी हल्ल्यात ६३ जणांचा बळी

बमाको – रविवारी दहशतवाद्यांनी माली आणि बुर्कीना फासो या दोन आफ्रिकी देशांमध्ये घडविलेल्या हल्ल्यांमध्ये ६३ जणांचा बळी गेला. ‘आयएस’, ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनांच्या घातपाताचे केंद्र बनलेल्या आफ्रिकेच्या साहेल प्रांतातील देशांसाठी गेला रविवार ‘ब्लॅक संडे’ ठरला. आठवड्यापूर्वी मालीच्या लष्कराने दोन दहशतवादी कमांडर्सना अटक केल्यानंतर येथील हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, मालीत सुरू असलेला घनघोर संघर्ष या देशाच्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरत असल्याची चिंता संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेने नुकतीच व्यक्त केली होती.

आफ्रिकेच्या साहेल प्रांतासाठी ‘ब्लॅक संडे’ माली, बुर्कीना फासोतील दहशतवादी हल्ल्यात ६३ जणांचा बळीमाली या पश्‍चिम आफ्रिकी देशातील तीन शहरांवर रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ले चढविले. नायजरच्या सीमेजवळ असलेल्या औतागूना, कारौ, दौतेजेफ या शहरांवरील हल्ल्यात दहशतवाद्यांनी स्थानिकांवर बेछूट गोळीबार केला. कारौमध्ये २०, दौतेजेफ येथील हल्ल्यात १७ तर औतागूना येथे १४ जणांचा बळी गेला. मोटारबाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी येथील लुटमार करून इथली घरे पेटवून दिली. तर काही घरातील गुरांचीही लूट केल्याचे स्थानिक अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

आफ्रिकेच्या साहेल प्रांतासाठी ‘ब्लॅक संडे’ माली, बुर्कीना फासोतील दहशतवादी हल्ल्यात ६३ जणांचा बळीया हल्ल्यांची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण कायम अस्थैर्य असलेल्या या माली, नायजर आणि बुर्कीना फासोच्या सीमाभागात अल कायदा आणि आयएससंलग्न दहशतवादी संघटनांचे वर्चस्व आहे. गेल्या आठवड्यात मालीच्या लष्कराने कारौ आणि औतागूना येथून दोन दहशतवादी कमांडर्सना ताब्यात घेतले होते. यासाठी स्थानिकांनी लष्कराला सहाय्य केल्याचा दावा केला जातो. त्यामुळे स्थानिकांना लक्ष्य करून दहशतवाद्यांनी मालीचे लष्कर तसेच इतरांनाही इशारा दिल्याचे बोलले जाते.

रविवारीच मालीच्या सीमेजवळ तैनात असलेल्या बुर्कीना फासोच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १२ जवानांचा बळी गेला असून आठ जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर सात जवान बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून माली आणि नायजर सीमेजवळ अशा स्वरुपाचे हल्ले चढवून दहशतवादी या देशांच्या लष्कराला आव्हान देत राहतात.

leave a reply