सिरियामध्ये रशिया-तुर्कीच्या गस्ती पथकावर बॉम्ब हल्ला

Syriaदमास्कस – सिरियाच्या इदलिब प्रांतात गस्त घालणाऱ्या रशिया व तुर्कीच्या संयुक्त पथकावर मंगळवारी बॉम्ब हल्ला झाला. या हल्ल्यात रशियाचे तीन तर तुर्कीचे बरेच जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मार्च महिन्यात रशिया आणि तुर्कीमध्ये झालेल्या संघर्षबंदीनंतर इदलिबमध्ये संयुक्त गस्त घालण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले होते. त्यानुसार इदलिब प्रांतात रशिया व तुर्कीच्या जवानांची संयुक्त गस्त सुरू होती. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

इदलिब प्रांतातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘एम४’ या महामार्गावर रशिया व तुर्कीच्या लष्कराची संयुक्त गस्त सुरू असताना हा हल्ला झाला. या बॉम्ब हल्ल्यात रशिया व तुर्कीच्या लष्कराच्या दोन वाहनांचे जबर नुकसान झाले. या हल्ल्यात रशियाचे तीनही जवान किरकोळ जखमी झाले तर तुर्कीच्या जखमी जवानांबाबत पूर्ण माहिती उघड झालेली नाही. पण या हल्ल्यात तुर्कीचे बरेच सैनिक जखमी झाल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. तर या हल्ल्यानंतरही सदर महामार्गावरील आपली गस्त सुरूच राहणार असल्याचे रशिया व तुर्कीने स्पष्ट केले आहे.

Syriaसिरियाची राजधानी दमास्कसला इदलिबमार्गे तुर्कीशी जोडणारा सगळ्यात महत्त्वाचा महामार्ग म्हणून ‘एम४’ ओळखला जातो. या महामार्गापासून तुर्कीची सीमारेषा सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. या महामार्गाचा ताबा मिळवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात तुर्की आणि सिरियन लष्करामध्ये जोरदार संघर्ष पेटला होता. या संघर्षात दोन्ही देशांच्या लष्कराला तसेच संलग्न गटांना मोठी जीवितहानी सोसावी लागली होती. रशियाचा पाठिंबा असलेल्या सिरियातील अस्साद राजवटीने तुर्कीचे लष्कर व संलग्न दहशतवादी गटांवर भीषण हल्ले चढविले होते. तर तुर्कीनेही सिरियात अधिकाधिक सैन्य घुसवून मोठ्या संघर्षाची तयारी केली होती. या संघर्षामुळे रशिया आणि तुर्कीमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मार्च महिन्यात रशियाने पुढाकार घेऊन तुर्किबरोबर संघर्षबंदी लागू केली होती. पण ही संघर्षबंदी फार काळ टिकणार नसल्याचे बोलले जात होते.

leave a reply