अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये प्रार्थनास्थळावर बॉम्बहल्ला

- १९ जण ठार झाल्याचा दावा

काबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवाद्यांनी प्रार्थनास्थळात घडविलेल्या स्फोटात १९ जण ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये तालिबानचे दहशतवादी असल्याचा दावा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून काबुलसह जलालाबाद व मझार-ए-शरीफ येथे तालिबानच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करणारे आयएस-खोरासनचे दहशतवादी यामागे असल्याचा संशय व्यक्त केला जातो. मात्र याबाबतची खात्रीलायक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये प्रार्थनास्थळावर बॉम्बहल्ला - १९ जण ठार झाल्याचा दावातालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याच्या दिवंगत आईसाठी प्रार्थना करण्यासाठी मोठा समुदाय याठिकाणी एकत्र आला होता. यात तालिबानच्या कमांडर्सचा सहभाग असल्याचेही सांगितले जाते. त्यांना लक्ष्य करण्यासाठी या प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट घडविण्यात आले. हा आत्मघाती हल्ला होता की बॉम्बस्फोट ते देखील बराच काळापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. मात्र तालिबानचे कमांडर्स व दहशतवादी या घातपाताच्या निशाण्यावर होते, असे दावे केले जातात.

इदिगाह प्रार्थनास्थळाच्या आवारात हा स्फोट झाल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने जाहीर केले होते. यात कित्येक नागरिकांचा बळी गेल्याचा दावा तालिबानने केला होता. तर प्रत्यक्षदर्शी व माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात १९ जण ठार झाले असून यामध्ये तालिबानच्या दहशतवाद्यांची संख्या अधिक असल्याचे सांगितले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटानंतरचे फोटो व व्हिडिओज् सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये प्रार्थनास्थळावर बॉम्बहल्ला - १९ जण ठार झाल्याचा दावागेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानात तालिबानच्या दहशतवाद्यांवरील हल्ले वाढले आहेत. राजधानी काबुलसह नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबाद तर अफगाणिस्तानच्या पश्‍चिमेकडील मझार-ए-शरीफ येथील तालिबानच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केले जात आहे. शनिवारी देखील जलालाबाद येथील हल्ल्यात तालिबानचे दोन दहशतवादी ठार झाले. याआधी काबुल व जलालाबाद येथील हल्ल्यांची जबाबदारी ‘आयएस-खोरासन’ने स्वीकारली होती.

तालिबान २० वर्षांपूर्वीची राहिली नसून या संघटनेने पाश्‍चिमात्यांशी तडजोड केली आहे. म्हणूनच तालिबानला संपवून व अफगाणिस्तानात आपली राजवट प्रस्थापित करण्याची धमकी आयएस-खोरासनने याआधी दिली होती. त्यामुळे रविवारी काबुलमधील प्रार्थनास्थळात झालेल्या हल्ल्यासाठी देखील आयएस-खोरासन असल्याची दाट शक्यता वर्तविली जाते.

पण अफगाणिस्तानातील वाढत्या हल्ल्यांमागे तालिबानमधील छोट्या गटांचे वाद असल्याचा दावा केला जातो. सरकारस्थापनेवरुन निर्माण झालेले मतभेद या हल्ल्यांसाठी कारणीभूत असू शकतात, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. येत्या काळात हा संघर्ष मोठ्याप्रमाणात उफाळून येईल, असा इशारा विश्‍लेषकांनी याआधीच दिला होता.

leave a reply