‘आयएस’ने इराकच्या बगदादमध्ये घडविलेल्या आत्मघाती स्फोटात 36 जणांचा बळी

आत्मघाती स्फोटातबगदाद – ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने इराकची राजधानी बगदादमध्ये घडविलेल्या आत्मघाती स्फोटात 36 जणांचा बळी गेला असून 60हून अधिक जण जखमी झाले आहेत. इराकमध्ये गेल्या वर्षभरात झालेला हा सर्वात भीषण स्फोट ठरला आहे. इराकचे पंतप्रधान पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार असून, त्यापूर्वी झालेला हा स्फोट इराकमधील सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्‍नचिन्ह उभे करणारा ठरला आहे.

सोमवारी राजधानी बगदादमधील ‘सद्र सिटी’त असलेल्या वाहेलात बाजारपेठेत भीषण स्फोट घडविण्यात आला. बुधवारी असलेल्या सणाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीला लक्ष्य करून स्फोट घडविण्यात आल्याचे मानले जाते. सुरुवातीला हा स्फोट ‘आयईडी’चा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र स्फोटानंतर काही तासांनी ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारताना, आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडविल्याची माहिती दिली. इराकमधील काही अधिकार्‍यांनीही स्फोट आत्मघाती असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

या वर्षात राजधानी बगदादमधील बाजारपेठेत घडविण्यात आलेला हा तिसरा स्फोट ठरला आहे. स्फोटात 36 जणांचा बळी गेला असून त्यात महिला व लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आत्मघाती स्फोटात 60हून अधिक जण जखमी झाले असून बळींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटात काही दुकानांची जळून राख झाल्याचे सांगण्यात आले. गेल्या तीन वर्षात राजधानी बगदादमध्ये झालेला हा सर्वात भीषण स्फोट असल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे.

आत्मघाती स्फोटातअमेरिका, सहकारी देश व इराकी लष्कराने राबविलेल्या मोहिमेनंतर 2017 साली ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेचा पराभव झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्यानंतरही ‘आयएस’चे इराकमधील जाळे अद्यापही कायम असून राजधानी बगदादसह देशाच्या विविध भागांमध्ये हल्ले तसेच आत्मघाती स्फोटांचे सत्र कायम आहे. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला इराकमधील अमेरिकी लष्कराच्या माघारीचा मुद्दाही तापला असून गेल्या सहा महिन्यांमध्ये, अमेरिकेच्या तळांवर आठ ड्रोन हल्ले व 17 रॉकेट हल्ले झाले आहेत.

अमेरिकेचे सध्या अडीच हजार जवान इराकमध्ये तैनात असून त्यांच्या माघारीसंदर्भात अमेरिकेने निश्‍चित धोरण जाहीर करावे, अशी मागणी इराकी नेत्यांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदिमी अमेरिकेच्या दौर्‍यावर जात आहेत. या दौर्‍यात सैन्यमाघारीबरोबरच इराकमधील राजकीय अस्थैर्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

इराकमधील शियापंथियांचे प्रमुख नेते ‘मुक्तदा अल सद्र’ यांनी काही दिवसांपूर्वीच इराक सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर इराक सरकारने ऑक्टोबर महिन्यात नव्या निवडणुकांची घोषणा केली आहे. मात्र सद्र यांनी या निवडणुकीत आपण सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी 2018 साली झालेल्या निवडणुकीत सद्र यांच्या राजकीय आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या.

leave a reply