‘पेंटॅगॉन’बाहेर झालेल्या हल्ल्यात पोलीस अधिकार्‍यासह हल्लेखोर ठार

‘पेंटॅगॉन’वॉशिंग्टन – अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असणार्‍या ‘पेंटॅगॉन’च्या इमारतीबाहेर झालेल्या हल्ल्यात एका पोलीस अधिकार्‍याचा बळी गेला असून, हल्लेखोर ठार झाला आहे. या हल्ल्यानंतर काही काळ पेंटॅगॉनच्या परिसरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. हल्ल्याच्या घटनेनंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी पेंटॅगॉनला भेट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. चार महिन्यांपूर्वी अमेरिकी संसदेच्या बाहेर झालेल्या हल्ल्यातही पोलीस अधिकार्‍याचा बळी गेला होता.

मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास 27 वर्षीय ऑस्टिन लॅन्झ या हल्लेखोराने ‘पेंटॅगॉन’च्या इमारतीबाहेर असलेल्या बस प्लॅटफॉर्मवर तैनात पोलीस अधिकार्‍याला सुर्‍याने भोसकले. पोलीस अधिकार्‍यापाठोपाठ प्लॅटफॉर्मवर उभ्या असणार्‍या इतरांवरही ‘पेंटॅगॉन’लॅन्झने वार केले. यात दोन व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लॅन्झचा हल्ला सुरू असतानाच या भागात तैनात इतर पोलीस अधिकार्‍यांनी हल्लेखोराला प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत हल्लेखोर लॅन्झ ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात बळी गेलेल्या पोलीस अधिकार्‍याचे नाव अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही. सदर पोलीस अधिकारी पेंटॅगॉनच्या सुरक्षेसाठी सक्रिय असणार्‍या ‘पेंटॅगॉन फोर्स प्रोटक्शन एजन्सी’चा अधिकारी असल्याचे समोर आले आहे. त्याच्या मृत्यूवर संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनीही शोक व्यक्त केला असून पेंटॅगॉन परिसरातील अमेरिकेचे ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आले होते. हल्ल्याच्या घटनेनंतर काही तासांसाठी पेंटॅगॉन व सभोवतालच्या परिसरात लॉकडाऊन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘पेंटॅगॉन’हल्लेखोर लॅन्झची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असल्याचे समोर आले आहे. एप्रिल महिन्यात त्याला घुसखोरी व चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न तसेच दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्याचे आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आले होते. मात्र पेंटॅगॉनबाहेर हल्ला चढविण्यामागील उद्देश अद्याप समोर आलेला नाही, असे तपासयंत्रणांनी स्पष्ट केले. सदर हल्ल्याचा तपास अमेरिकेची प्रमुख तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’कडे (एफबीआय) सोपविण्यात आला आहे.

अमेरिकेतील संवेदनशील व सुरक्षेच्या दृष्टिने महत्त्चाच्या भागात हल्ला होण्याची ही गेल्या पाच महिन्यातील तिसरी घटना आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात अमेरिकी संसदेचा परिसर म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘युएस कॅपिटल’ भागात गाडी धडकवून करण्यात आलेल्या हल्ल्यात हल्लखोरासह पोलीस अधिकार्‍याचा बळी गेला होता. त्यानंतर मे महिन्यात गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’च्या मुख्यालयाबाहेर झालेल्या चकमकीत हल्लखोर ठार झाला होता.

leave a reply