अफगाणिस्तानात नव्याने तैनातीचा ब्रिटनला अधिकार

- ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचे उपमंत्री

लंडन – ‘अमेरिकेबरोबर ब्रिटन देखील अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेण्यास सुरुवात करील. पण त्यानंतर अफगाणिस्तानच्या भूभागातून ब्रिटनच्या सुरक्षेला धोका निर्माण झालाच तर या देशात नव्याने सैन्यतैनाती करण्याचा पूर्ण अधिकार ब्रिटनला आहे’, अशी घोषणा ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचे उपमंत्री जेम्स हेप्पे यांनी केली. पण राजकीय वाटाघाटीतून अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित होईल, असा विश्‍वास जेम्स हेप्पे यांनी व्यक्त केला. ९/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने पुकारलेल्या युद्धात ब्रिटन हा अमेरिकेचा महत्त्वाचा साथीदार राहिला आहे.

सध्या अफगाणिस्तानात ब्रिटनचे ७५० जवान तैनात आहेत. ही तैनाती पूर्णपणे बचावात्मक असून अफगाणी जवानांना दहशतवादविरोधी कारवायांचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ब्रिटनने स्वीकारली आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीची घोषणा केल्यानंतर ब्रिटननेही त्याचे समर्थन केले. तसेच ब्रिटनचे लष्करही ११ सप्टेंबरपर्यंत पूर्ण माघार घेईल, असे स्पष्ट केले होते. पण या सैन्यमाघारीनंतर ब्रिटन किंवा ब्रिटनच्या हितसंबंधांवर हल्ला झाला व यासाठी अफगाणिस्तानातील दहशतवादी सहभागी असल्याचे उघड झाल्यास या देशात पुन्हा सैन्यतैनाती करण्याचा अधिकार ब्रिटनकडे असेल. यासंबंधीचा एकतर्फी निर्णय घेण्याचा अधिकारही ब्रिटनला आहे, असे उपमंत्री हेप्पे यांनी स्पष्ट केले.

leave a reply