ऑईल टँकरवर हल्ला चढविणार्‍या इराणला ब्रिटन उत्तर देणार – सायबर हल्ले, स्पेशल फोर्सेसच्या पर्यायांचा विचार

सायबर हल्ले

लंडन – ‘मर्सर स्ट्रीट’ या इंधनवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात आपल्या नागरिकाचा बळी गेल्यामुळे खवळलेल्या ब्रिटनने इराणला धडा शिकविण्याची तयारी केली आहे. स्पेशल फोर्सेचा वापर करून थेट इराणच्या ड्रोन कमांड सेंटरवर कारवाई करणे, सायबर हल्ले चढविणे किंवा अन्य पर्यायांवर ब्रिटन विचार करीत असल्याची माहिती ब्रिटनच्या वर्तमानपत्राने दिली. याआधीच अमेरिका, इस्रायल, ब्रिटन आणि रोमानिया या देशांमध्ये इराणला प्रत्युत्तर देण्याबाबत चर्चा झाली होती. दोन दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी देखील सागरी सुरक्षा धोक्यात टाकणार्‍या इराणवर कारवाईचा इशारा दिला होता.

गेल्या आठवड्यात ओमानच्या सागरी क्षेत्राजवळून आखातासाठी प्रवास करणार्‍या ‘मर्सर स्ट्रीट’ इंधनवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात दोन कर्मचार्‍यांचा बळी गेला. यामध्ये ब्रिटन व रोमानियाच्या नागरिकांचा समावेश होता. याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले. अमेरिका व ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यावर संताप व्यक्त केला. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इराणला परिणामांसाठी तयार राहण्याचे बजावले. पण पाश्‍चिमात्य मित्रदेश इराणविरोधात कोणती कारवाई करणार ते स्पष्ट झाले नव्हते.

सायबर हल्ले

ब्रिटनमधील आघाडीच्या वर्तमानपत्राने परराष्ट्र व संरक्षण मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधी बातमी प्रसिद्ध केली. इराणवरील कारवाईसाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरू आहे. सायबर हल्ल्याचा वापर होण्याची दाट शक्यता असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्राने सांगितले. त्याचबरोबर स्पेशल फोर्सेसचा वापर करण्याचा पर्यायही सुचविला आहे. ब्रिटनच्या स्पेशल फोर्सेसचे जवान गेल्या काही आठवड्यांपासून आखातात तैनात आहेत. इंधनवाहू जहाजावरील हल्ल्यासाठी जबाबदार असणारे इराणमधील ड्रोन कमांड सेंटर उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी या स्पेशल फोर्सेसच्या जवानांना दिली जाऊ शकते, असा दावा या वर्तमानपत्राने केला.

मर्सर स्ट्रीटवरील कारवाईनंतर ब्रिटनमधील माध्यमांनी इराणविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. ब्रिटनच्या नागरिकाचा बळी घेऊन कुणीही सुखरूप राहू शकत नाही, हा संदेश देणे गरजेचे आहे. त्यासाठी लष्करी कारवाई आवश्यक असल्याचे सदर बातमीत म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातील इराणच्या कारवाया सहन न करण्याच्या पातळीवर पोहोचल्या असून यापुढे त्या सहन केले जाणार नसल्याचे ब्रिटनमधील आणखी एका वर्तमानपत्राने म्हटले आहे.

दरम्यान, मर्सर स्ट्रीटप्रमाणे युएईच्या इंधनवाहू जहाजाच्या अपहरणामागे इराण असल्याचे उघड झाले आहे. पाच ते सहा सशस्त्र हल्लेखोरांनी युएईच्या ‘अस्फाल्ट प्रिन्सेस’ या इंधनवाहू जहाजाचा ताबा मिळवून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. सदर जहाज इराणच्या दिशेने वळविण्याचा या अपहरणकर्त्यांचा डाव होता. पण जहाजावरील कर्मचार्‍यांनीच इंजिनमध्ये बिघाड केल्यामुळे अपहरणकर्त्यांना जहाज सोडून जावे लागले, अशी माहिती समोर येत आहे. अपहरणकर्ते इराणी कमांडोज् होते, असा दावा केला जातो.

leave a reply