अफगाणिस्तानात अमेरिकेला सहाय्य करून पाकिस्तानने अतोनात नुकसान करून घेतले

- पाकिस्तानच्या पंतप्रधानांची तक्रार

इस्लामाबाद – ‘अफगाणिस्तानातील युद्धासाठी अमेरिकेला साथ देऊन पाकिस्तानने आपले अतोनात नुकसान करून घेतले. तरीही अमेरिका पाकिस्तानवर विश्‍वासघाताचे आरोप करीत आहे. अफगाणिस्तानातील अपयशासाठी अमेरिका पाकिस्तानला बळीचा बकरा बनवित आहे’, अशी तक्रार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. आरटी या रशियन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे पंतप्रधान बोलत होते. सीएनएन या अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे इम्रान खान यांची पाकिस्तानसह आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये खिल्ली उडविली जात आहे. अशा परिस्थितीत रशियन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी अमेरिकेवर नव्या आरोपांची फैर झाडली आहे.

अफगाणिस्तानात अमेरिकेला सहाय्य करून पाकिस्तानने अतोनात नुकसान करून घेतले - पाकिस्तानच्या पंतप्रधानांची तक्रारअफगाणिस्तानातील युद्धासाठी अमेरिकेला सहकार्य करण्याचा निर्णय घेऊन पाकिस्तानने फार मोठी चूक केली, असा दावा पंतप्रधान इम्रान खान यांनी केला. सोव्हिएत रशियाच्या अफगाणिस्तानवरील आक्रमणाला विरोध करण्यासाठी अमेरिकेच्या साथीने पाकिस्तानी लष्कराने मुजाहिद्दीन तयार केले व त्यांना प्रशिक्षित केले. पण ९/११च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढविला आणि त्याला साथ देणार्‍या पाकिस्तानने आपणच तयार केलेल्या मुजाहिद्दीनांना दहशतवादी ठरविले. याचे भयंकर परिणाम पाकिस्तानला सहन करावे लागले. यातील काहीजण पाकिस्तानवर उलटले आणि त्यांनी पाकिस्तानी लष्करावर हल्ले चढविले, या इतिहासाची पंतप्रधान इम्रान खान यांनी या मुलाखतीत उजळणी केली.

आपण प्रशिक्षण दिलेल्या मुजाहिद्दीनांचे हल्ले पाकिस्तानी लष्कराला झेलावे लागले. इतकेच नाही तर बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना, पाकिस्तानात अमेरिकेचे ड्रोन हल्ले सुरू झाले. पाकिस्तानने सुमारे दोन लाख, ८० हजार ड्रोन हल्ले सहन केले. अमेरिकेला अफगाणिस्तानातील युद्धासाठी केलेल्या सहाय्यामुळे पाकिस्तानात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ८० हजार जणांचा बळी गेला. इतके सारे करूनही अमेरिका अफगाणिस्तानातील आपल्या अपयशाचे खापर पाकिस्तानवर फोडून अमेरिका पाकिस्तानला बळीचा बकरा बनवित आहे, अशी खंत पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली.

अफगाणिस्तानात अमेरिकेला सहाय्य करून पाकिस्तानने अतोनात नुकसान करून घेतले - पाकिस्तानच्या पंतप्रधानांची तक्रारदरम्यान, या मुलाखतीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुन्हा एकदा तालिबानचे समर्थन केले. जगाने तालिबानच्या राजवटीला मान्यता द्यावी, हा एकमेव मार्ग जगासमोर असल्याचे इम्रान खान म्हणाले. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये इम्रान खान करीत असलेले हे दावे पाकिस्तानसाठी उपकारक नाही, तर भयंकर ठरत असल्याची चिंता पाकिस्तानच्याच काही विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे. सीएनएन या अमेरिकी वृत्तवाहिनीला काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी केलेले दावे थट्टेचा विषय बनले होते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांना अफगाणिस्तानची काहीच माहिती नसल्याचा दावा करून हक्कानी हा अफगाणिस्तानात वास्तव्य करून राहणारा समुदाय असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला होता. अफगाणिस्तानात हक्कानी गटाचे दहशतवादी असतील, पण हक्कानी नावाचा समुदाय नाही, याकडे आंतरराष्ट्रीय निरिक्षकांनी लक्ष वेधले. पाकिस्तानच्याच पंतप्रधानांना यामुळे शेजारी देशाची पुरेशी माहिती नसल्याचे यामुळे जगजाहीर झाले होते.

अमेरिकेवर टीका करण्यापेक्षा इम्रान खान यांनी तोंड बंद ठेवले, तर ते पाकिस्तानसाठी अधिक श्रेयस्कर ठरेल. कारण इम्रान खान यांच्या मुलाखती पाकिस्तानच्या समस्या कमी करण्याऐवजी त्या वाढवित आहेत, अशी टीका पाकिस्तानचे पत्रकार करीत आहेत. यापैकी काही पत्रकारांनी तर इम्रान खान यांना पंतप्रधान बनविणार्‍या पाकिस्तानच्या लष्करावर पश्‍चातापाची वेळ ओढवल्याचे दावे केले आहेत. लवकरच पाकिस्तानचे लष्कर ही चूक दुरूस्त करण्याच्या तयारीत असल्याची खबर दिली आहे.

leave a reply