‘लिथियम’साठी भारत-अर्जेंटिना कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली -‘लिथियम’ साठ्यांचा शोध, उत्खनन आणि त्याचा लाभ घेण्यासाठी अर्जेंटिनाबरोबर करार करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. देशात ईलेक्ट्रीक वाहने व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बॅटरिसाठी लिथियमची मागणी वाढत आहे. भविष्यातील या इंधनाचा पुरवठा सुरक्षित करण्याकरीता व याबाबतीत चीनवरील निर्भरता कमी करण्याच्या दृष्टीने अर्जेंटिनाबरोबर कराराची ही तयारी अतिशय महत्त्वाची ठरते.

‘लिथियम’साठी भारत-अर्जेंटिना कराराला मंत्रिमंडळाची मंजुरीभारत सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर लिथियम बॅटरिजची आयात करतो. तसेच भारतात तयार होणार्‍या लिथियम बॅटरिजसाठी लागणारे लिथियमही भारताला मोठ्या प्रमाणावर आयात करावे लागते. भारतात ही लिथियमची आयात सर्वात मोठ्या प्रमाणावर चीनमधून होते. मात्र भविष्यात देशांत लिथियम बॅटरिजची मागणी आणखी वाढत जाणार असून यासाठी कोणा एका दुसर्‍या देशावर भारताला अवलंबून राहता येणार नाही. तसेच चीनवरील या बाबतीतील निर्भरता कमी करायची असेल, तर भारताने यासाठी इतर पर्यांंयाचा शोध घेणे आवश्यक ठरते. भारत सरकारने ई-वाहनासाठी आवश्यक असणार्‍या लिथियम बॅटरिजचे 100 टक्के उत्पादन भारतातच घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच 2030 पर्यंत भारताला 100 टक्के ई-वाहने असणारा देश बनविण्याचे लक्ष्यही सरकारने ठेवले आहे.

या पार्श्‍वभूमीवर भारत ई-वाहनांसह लॅपटॉप आणि मोबाईलच्या रिचार्जेबल बॅटरिजसाठी लागणार्‍या लिथियम इंधनाचा पुरवठा सुरक्षित करू पाहत आहे. यादृष्टीने लिथियमसाठ्यांच्या बाबतीत संपन्न असलेल्या दक्षिण अमेरिकी देशांबरोबर भारत सहकार्य वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. काही महिन्यांपूर्वी भारताच्या ‘खनिज विदेश लिमिटेड’ने यासंदर्भात अर्जेंटिनाबरोबर करार केल्याचे वृत्त आले होते. देशाला आवश्यक असणार्‍या खनिजाच्या खरेदीची जबाबदारी खनिज विदेश लिमिटेडकडे आहे. यामुळे या वृत्ताचे महत्त्व वाढले होते.

‘लिथियम’साठी भारत-अर्जेंटिना कराराला मंत्रिमंडळाची मंजुरीआता भारत सरकारचे खाण मंत्रालय आणि अर्जेंटिनाच्या उत्पादक विकास मंत्रालयाच्या खाण धोरण सचिवालयादरम्यान ‘लिथियम’साठी करार होणार आहे. यासंदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. लिथियमसारख्या खनिज इंधनाचा पुरवठा भविष्यात सुरक्षित राहवा यादृष्टीने हा व्यूहरचनात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा करार ठरणार आहे. लिथियम साठ्यांचा शोध घेणे, तेथील उत्खननाची क्षमता पडताळणे, उत्खनन, खाणकाम क्षेत्रात गुंतवणूक, लिथियमच्या पुरवठ्यासाठी हा करार करण्यात येणार आहे. मात्र याबरोबरच दोन्ही देशांमध्ये तांत्रिक व वैज्ञानिक माहितीचे आदानप्रदान, प्रशिक्षण, क्षमता उभारणी आदीबाबींमध्येही सहकार्य होणार आहे.

दरम्यान, भारत अर्जेंटिनाबरोबर याच क्षेत्रातील चिली आणि बोलिव्हियाबरोबरही लिथियमसाठी कराराच्या तयारीत असल्याच्या बातम्या याआधी आल्या होत्या. अर्जेंटिना, चिली आणि बोलिव्हिया हे तीन शेजारी दक्षिण अमेरिकन देश ‘लिथियम ट्रँगल’ म्हणून ओळखले जातात. याशिवाय फेब्रुवारी महिन्यात लोकसभेत सरकारने दिलेल्या लेखी उत्तरात भारतात कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात लिथियमचा साठा सापडल्याची माहिती दिली होती. मांड्यामध्ये 1600 टन लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आाहे. भारतात इतरत्रही असे साठे आहेत का? याचा शोध सुरू आहे.

leave a reply