म्यानमारच्या जुंटाविरोधात राष्ट्रव्यापी उठावाची हाक

राष्ट्रव्यापीबँकॉक – म्यानमारमधील लोकनियुक्त सरकार पाडून सत्तेचा ताबा घेणार्‍या लष्करी राजवटीविरोधात जनतेने राष्ट्रव्यापी उठाव करा, असे आवाहन म्यानमारच्या भूमिगत सरकारने केले आहे. म्यानमारला लष्करी राजवटीच्या तावडीतून सोडविण्यासाठी छोट्या-मोठ्या सशस्त्र टोळ्यांनी लष्कर तसेच लष्करी ठिकाणांना लक्ष्य करावे, अशी चिथावणी या भूमिगत सरकारचे हंगामी राष्ट्राध्यक्ष दूवा लाशी ला यांनी केले.

सात महिन्यांपूर्वी म्यानमारच्या लष्कराने आँग सॅन स्यू की यांचे बहुमताने निवडून आलेले सरकार पाडले होते. तसेच स्यू की यांच्यासह सरकारमधील सर्व महत्त्वाचे नेते व अधिकार्‍यांना ताब्यात घेतले होते. यानंतर म्यानमारच्या जनतेने ठिकठिकाणी लष्कराविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी लष्कराने केलेल्या गोळीबारात तसेच निघृण हत्याकांडात किमान हजार जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. तर हजारो निदर्शक अजूनही लष्कराच्या ताब्यात असून लष्कराने मुली, महिलांवर अत्याचार केल्याच्या भयंकर घटनाही समोर आल्या होत्या.

गेल्या काही आठवड्यांपासून म्यानमारमधील ही निदर्शने थंडावली होती. पण मंगळवारी हंगामी राष्ट्राध्यक्ष दुवा लाशी ला यांनी राष्ट्रव्यापी उठावाची मागणी केल्यानंतर म्यानमारमध्ये पुन्हा भडका उडण्याची शक्यता बळावली आहे. असियान तसेच पाश्‍चिमात्य देशांनी विरोधी गटाच्या या आवाहनावर आक्षेप नोंदविला आहे. तसेच सर्व गटांना संयम बाळगण्याची आवाहन केले आहे.

leave a reply