‘रेमडेसिवीर’च्या निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी

‘रेमडेसिवीर’नवी दिल्ली – देेेशात कोरोनाच्या साथीचा नवा उद्रेक झाला असताना कोरोनाचा संसर्ग जास्त झालेल्या रुग्णांसाठी जीवनदायी औषध ठरत असलेल्या ‘रेमडेसिवीर’ या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत होता. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाची साथ ओसरेपर्यंत देेशात या इंजेक्शनचे उत्पादन घेणार्‍या कंपन्यांना त्यांची निर्यात करण्यास बंदी घालण्यात आली आहे. रविवारी केंद्र सरकारने हा बंदी आदेश लागू केला.

‘रेमडेसिवीर’ हे इंजेक्शन कोरोनाचा संसर्ग जास्त प्रमाणात झालेल्या रुग्णांना जीव वाचविण्यासाठी अतिशय उपयोगी ठरत आहे. ‘रेमडेसिवीर’ हे ऍन्टी व्हायरल इंजेक्शन असून ‘सार्स’ आणि ‘मर्स’ या रोगांवर उपचारासाठी हे इंजेक्शन अतिशय प्रभावी ठरले होते. गेल्यावर्षी कोेरोनाच्या साथीच्या पहिल्या उद्रेकांमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करायचे याबाबत आरोग्य यंत्रणा अनभिज्ञ होत्या. त्यावेळी ‘रेमडेसिवीर’ हे इंजेक्शन अत्यंत प्रभावी ठरले होते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) हे इंजेक्शन प्रभावी ठरू शकते, असा विश्‍वास व्यक्त केल्यावर भारताने ही इंजेक्शन बांगलादेशमधून आयात केली होती. कारण त्यावेळी भारतात एकही औषध कंपनी या ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेत नव्हती.

गेल्यावर्षी जून महिन्यात भारताच्या ड्रग्ज कंन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ‘रेमडेसिवीर’च्या उत्पादनाला, तसेच त्याच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली. या इंजेक्शनचे पेटंट असलेल्या अमेरिकेच्या गिलियड सायन्सेसशी करार करून भारतात काही कंपन्यांनी या इंजेक्शनचे उत्पादन सुरू केले. यामुळे कितीतरी जणांचे प्राण वाचल्याचा दावा केला जातो. देशात या इंजेक्शनचे उत्पादन सुरू झाल्याने सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेने शिखर गाठले असतानाही या इंजेक्शनचा तुटवडा जाणवला नव्हता.

मात्र नोव्हेंबरनंतर देशात कोरोनाचा संसर्ग कमी झाला व रुग्णांची संख्या रोडावत गेली. त्यानंतर या इंजेक्शनची मागणी घटल्याने कंपन्यांनी उत्पादन कमी केले होते. मार्च महिन्यात अचानक कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले, त्यानंतर या इंजेक्शनचे पुन्हा उत्पादन करण्यास भारतीय कंपन्यांनी सुरूवात केली. पण या इंजेक्शनसाठी लागणारा कच्चा माल हा आयात करावा लागत असल्याने यासाठी लागणारा वेग व इंजेक्शन उत्पादनातील इतर प्रक्रियेसाठी लागणारा काळ पाहता अचानक उत्पादन मोठ्या प्रमाणाव घेणे कंपन्यांना शक्य नव्हते. त्यामुळे या इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला. यातून या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाल्याचे समोर आले.

गेल्यावर्षी साडे सहा हजार रुपये असणार्‍या या इंजेक्शनची किंमत डिसेंबर महिन्यात महाराष्ट्र सरकारने २३६० रुपये इतकी निश्‍चित केली होती. मात्र तरीसुद्धा महाराष्ट्रात सध्या हे इंजेक्शन साडे चार ते पाच हजार रुपयांना विकले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच केवळ रुग्णालयांमधील फार्मसीमधून ही इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना ही इंजेक्शन मिळविण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सरकारने या इंजेक्शनचा वितरण व पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी कन्ट्रोल रुम स्थापन करीत असल्याच्या बातम्या आहेत. तसेच ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची किंमत १४०० रुपयांपर्यंत निश्‍चित करण्याच्या प्रस्तावावरही सरकार विचार करीत आहे.

महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातही ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा व किंमतींवरून गोंधळ उडाला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने कोरोनाची साथ नियंत्रणात येईपर्यंत या ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत राहू शकेल. याशिवाय ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन वाढवा, असेही केंद्र सरकारकडून कंपन्यांना सांगण्यात आले आहे. तसेच या इंजेक्शनचे उत्पादन घेणार्‍या कंपन्यांना पुरवठा व वितरणाची माहिती सरकारला देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

leave a reply