केंद्र सरकारकडून ‘बायोलॉजिकल-ई’च्या 30 कोटी लसींची आगाऊ खरेदी

नवी दिल्ली – ‘बायोलॉजिकल-ई’ या भारतीय कंपनीने विकसित केलेल्या कोरोनावरील लसीच्या 30 कोटी डोसची केंद्र सरकारने आगाऊ मागणी नोंदविली आहे. यासाठी कंपनीला 1500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ऑगस्टनंतर या लसीचे डोस मिळण्यास सुरूवात होतील.

‘बायोलॉजिकल-ई’भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींद्वारे लसीकरण सुरू आहे. तर रशियाच्या स्फुटनिक व्ही या लसीलाही मंजुरी दिल्यानंतर या लसीचे काही लाख डोस आयात झाले आहेत, तर लवकरच भारतातही या लसीचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. डॉ. रेड्डी भारतात या लसींचे उत्पादन घेणार आहे. याबरोबरच सिरम इन्स्टिट्यूटनेही आता स्फुटनिक व्ही लसीच्या उत्पादनासाठी ड्रग्ज कन्ट्रोलर ऑफ इंडिया (डीसीजीआय) परवाना मिळण्यासाठी अर्ज केला आहे.

याबरोबर केंद्र सरकार फायजर आणि मॉडर्नासारख्या कंपन्यांबरोबरही चर्चा करीत असून या लसींना जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याने त्यांच्या भारतात चाचण्या न घेताच परवानगी देण्याची तयारी सरकारने केली आहे. त्यामुळे या लसीही येत्या काही दिवसात भारतात आयात होतील, अशी आशा आहे. तसेच फायजरचे उत्पादन भारतात घेण्यावरही चर्चा सुरू आहे.

या व्यतिरिक्त आणखी एक स्वदेशी लस लवकरच उपलब्ध होणार आहे. ‘बायोलॉजिकल-ई’ या हैदराबाद येथील कंपनीने तयार केलेल्या लसीला अद्याप डीसीजीआयने मंजुरी दिलेली नाही. या लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. मात्र त्याआधीच सरकारने या लसीचे 30 कोटी डोस बुक केले आहेत. यासाठी कंपनीला 1500 कोटी रुपये केंद्र सरकार आगऊ देणार आहे. ऑगस्टपासून ते डिसेंबरदरम्यान या 30 कोटी लसी सरकारला मिळतील, अशी शक्यता आहे.

‘बायोलॉजिकल-ई’ लसीच्या विकासासाठी भारत सरकारने कंपनीला आर्थिक सहाय्य केले आहे. तसेच सरकारने 30 कोटी लसींचे पैसे आधिच कंपनीला दिल्याने यातून कंपनीला आपली उत्पादन क्षमता वाढविता येणार आहे. याआधी कोविशिल्डसाठी सिरमला आणि कोव्हॅक्सिनसाठी भारत बायोटेकला अशाच प्रकारे लसींचे सर्व पैसे एकसाथ देण्यात आले होते. यामुळे या कंपन्यांना आपली उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी एकसाथ मोठा निधी उपलब्ध झाला होता.

दरम्यान, 30 कोटी लसींसाठी ‘बायोलॉजिकल-ई’ला देण्यात आलेले 1500 कोटी बघता ही लस सरकारला केवळ 50 रुपयाला पडणार असल्याचे लक्षात येते. तसेच खाजगी क्षेत्राला ही लस 110 ते 125 रुपयाला मिळेल, असे वृत्त आहे.

leave a reply