केंद्र सरकारकडून खरिप पिकांच्या आधारभूत मूल्यांमध्ये वाढ

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या अर्थविषयक मंत्रिगटाच्या बैठकीत पिकांच्या आधारभूत मूल्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. खरिप हंगमातील जवळजवळ सर्व पिकांच्या आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. विशेषत: डाळी आणि तेल बियाणांच्या प्रति क्विंटल आधारभूत मूल्यात मोठी वाढ करण्यात आली आहे.

खरिप2021-22 सालातील खरीप हंगामातील पिक उत्पादक शेतकर्‍यांना त्यांच्या कृषीमालाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी आधारभूत मूल्य निश्‍चित करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाच्या बैठकीत या आधारभूत मूल्यातील वाढीला मंजुरी देण्यात आली. तिळाच्या आधारभूत किंमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. तिळाचे प्रति क्विंटल मूल्य 452 रुपयाने वाढवून 7307 रुपये इतके करण्यात आले आहे. त्यानंतर तूर डाळ आणि उडीद डाळीच्या आधारभूत मूल्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. या दोन्ही डाळीचे आधारभूत मूल्य हे 300 रुपयांनी वाढविण्यात आले आहे. या दोन्ही डाळींना 6300 इतका भाव मिळणार आहे. मूग डाळीच्या आधारभूत मूल्यात 79 रुपयांची वाढ करण्यात आली असून 7275 प्रति क्विंटल इतका दर ठरविण्यात आला आहे.

यानंतर भुईमूग आणि कारळ बियांच्या पिकांमध्ये अनुक्रमे 275 आणि 235 इतकी वाढ करण्यात आली आहे. भूईमूगाला या खरीप हंगामासाठी प्रति क्विंटल 5550 आणि कारळ बियांना 6930 इतका भाव मिळणार आहे. सूर्यफुलांच्या बियांचे मूल्य 130 रुपयांनी वाढवून 6015 प्रति क्विंटल इतके करण्यात आले आहे.

मध्यम रेषाच्या कापसाच्या मूल्यामध्ये 211 आणि लांब रेषाच्या कापसामध्ये 200 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ज्वारीचे आधारभूत मूल्य 118 रुपयांनी वाढवून 2758 रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे. धानाच्या किंमतीत मात्र किंचित वाढ झाली आहे. धानाचे आधारभूत मूल्य 72 रुपये प्रति क्विंटलने वाढून 1960 रुपये इतके झाले आहे.

दरम्यान, मागील रब्बी हंगामाच्या तुलनेत यावर्षी गहू खरेदी 12.12 टक्क्यांनी वाढल्याची माहिती सरकारने दिली आहे. आतापर्यंत एकूण 418.47 मेट्रिक टन गहू सरकारने आधारभूत मूल्यामध्ये खरेदी केला असून गेल्यावर्षी 373 मेट्रीक टन इतका गहू याच कालावधीपर्यंत खरेदी झाला होता. सरकारकडून करण्यात आलेल्या गहू खरेदीचा लाभ 46 लाख शेतकर्‍यांना मिळाल्याचे सरकारने म्हटले आहे.

leave a reply