‘साऊथ चायना सी’मधून प्रवास करणाऱ्या परदेशी जहाजांसाठी चीनचे नवे नियम जाहीर

नवे नियमबीजिंग – साऱ्या जगाचे लक्ष अफगाणिस्तानातील घडामोडींकडे लागलेले असताना, चीनने ‘साऊथ चायना सी’वर आपली पकड भक्कम करण्यासाठी पावले टाकली आहेत. या सागरी क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या परदेशी जहाजांसाठी चीनने नवे नियम जाहीर केले. यानुसार संबंधित सागरी क्षेत्रातून प्रवास करण्याआधी परदेशी लष्करी व मालवाहू जहाजांनी त्यातील साहित्याची पूर्ण माहिती चीनला कळविणे बंधनकारक असेल. येत्या बुधवारी, 1 सप्टेंबरपासून साऊथ चायना सी क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या जहाजांसाठी हे नियम लागू केले जाती. चीनच्या या नव्या नियमांमुळे साऊथ चायना सीच्या क्षेत्रात नवा तणाव निर्माण होऊ शकतो.

साऊथ चायना सीच्या जवळजवळ सर्वच्या सर्व 13 लाख चौरस मैल क्षेत्रावर चीन आपला अधिकार सांगत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निकालही चीनला अमान्य आहे. फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान या देशांच्या सागरी क्षेत्रावरही चीन दावा करीत आहे. यासाठी चीनने या देशांवर ‘नाईन डॅश लाईन’ थोपविली आहे. साऊथ चायना सीच्या बहुतांश क्षेत्रावरील दावेदारी भक्कम करण्यासाठी चीनने ‘नाईन डॅश लाईन’ची आखणी केली होती.

आंतरराष्ट्रीय समुदायाने आपली ही नाईन डॅश लाईन मान्य करावी, यासाठी चीनचे प्रयत्न सुरू असतात. रविवारी चीनच्या मेरिटाईम सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनने जाहीर केलेली नवी नियमावली देखील याच प्रयत्नांचा एक भाग ठरते. यानुसार, चीनच्या कथित सागरी क्षेत्रातून प्रवास करणारी आण्विक जहाजे, पाणबुड्या, किरणोत्सर्गी साहित्य आणि इंधन वाहून नेणारी जहाजे त्याचबरोबर रसायने, द्रवरूप वायू आणि इतर विषारी व हानिकारक पदार्थांसह प्रवास करणाऱ्या परदेशी जहाजांनी चीनच्या यंत्रणांना जहाजातील साहित्याची सर्व माहिती कळविणे आवश्‍यकआहे.

नवे नियमचीनची सागरी सुरक्षा निश्‍चित करण्यासाठी या सागरी नियमांची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्‍यक असल्याची चिनी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. या नव्या नियमांमुळे चीनच्या सागरी क्षेत्रात परदेशी जहाजांच्या हालचालींवर बंधने लावणे सोपे होईल, असा दावा चिनी लष्करी विश्‍लेषक साँग झाँगपिंग यांनी केला. त्याचबरोबर साऊथ चायना सी क्षेत्रात ड्रोनद्वारे हेरगिरी करण्यावर देखील बंधने येतील, असे चीनच्या मुखपत्राचे म्हणणे आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या दोन युद्धनौकांनी तैवानच्या सागरी क्षेत्रातून प्रवास केला. यानंतर खवळलेल्या चीनने अमेरिकेला धमकावले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसात ‘साऊथ चायना सी’वर आपली पकड मजबूत करण्यासाठी चीनने नवे नियम जाहीर केल्याचे दिसत आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानातील घडामोडींमुळे अमेरिकेच्या मित्र व सहकारी देशांचे बायडेन प्रशासनावरील विश्‍वासाला तडे गेल्याचा दावा केला जातो. याचा फायदा चीन घेईल, असे इशारे अमेरिका तसेच ब्रिटनचे माजी लष्करी अधिकारी व विश्‍लेषक देत आहेत. चीनने देखील तैवानला धमकावताना, अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या माघारीचा दाखला दिला होता. या पार्श्‍वभूमीवर, चीन साऊथ चायना सी क्षेत्रात आक्रमक प्रदर्शन करीत आहे. याची गंभीर नोंद पाश्‍चिमात्य देशांनी घेतली आहे. युरोपिय देशांबरोबर भारत देखील या सागरी क्षेत्रातील चीनच्या वर्चस्वाला धक्के देण्याची तयारी करीत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय नौदलाची टास्क फोर्स या सागरी क्षेत्रात रवाना करण्यात आली होती.

leave a reply