चीनकडून अमेरिकेच्या सहा संसद सदस्यांसह ११ जणांवर निर्बंधांची घोषणा

बीजिंग – अमेरिकेने हॉंगकॉंग मुद्यावर केलेला कारवाईला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेतील ११ जणांवर निर्बंधांची घोषणा केली आहे. त्यात मार्को रुबिओ, टेड क्रूझ यांच्यासह सहा संसद सदस्य आणि पाच स्वयंसेवी संस्थांच्या प्रमुखांचा समावेश आहे. हॉंगकॉंग मुद्द्यावर चुकीचे वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अमेरिकेवर निर्बंधांची कारवाई करीत असतानाच, चीनच्या सुरक्षायंत्रणांनी हॉंगकॉंगमधील ‘ॲप्पल डेली’ या दैनिकाचे प्रमुख जिम्मी लाय यांच्यासह ॲग्नस चोऊ व विल्सन ली यांना अटक केली आहे. चीनने हॉंगकॉंगमध्ये लागू केलेल्या नव्या ‘सिक्युरिटी लॉ’अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून त्याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

China-Americaगेल्या आठवड्यात, अमेरिकेने हॉंगकॉंगच्या प्रशासकीय प्रमुख कॅरी लॅम यांच्यासह ११ जणांवर निर्बंध लादल्याची घोषणा केली होती. हॉंगकॉंगच्या जनतेचे स्वातंत्र्य चिरडणार्‍या नेते व अधिकाऱ्यांवर अमेरिका कारवाई करेल, अशी ठाम भूमिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली असून, त्यानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिली होती. अमेरिकेच्या या कारवाईला जशास तसे प्रत्युत्तर म्हणून अमेरिकी संसद सदस्यांसह इतरांवर निर्बंध लादण्यात येत असल्याची माहिती चीनच्या प्रवक्त्यांनी दिली.

चीनने जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये वरिष्ठ सिनेटर टेड क्रूझ, मार्को रुबिओ यांच्यासह टॉम कॉटन, जोश हॉले, पॅट टूमी व ख्रिस स्मिथ या संसद सदस्यांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त ‘नॅशनल एन्डोवमेंट फॉर डेमोक्रॅसी’चे प्रमुख कार्ल गर्समन, ‘नॅशनल डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूट’चे प्रमुख डेरेक मिशेल, ‘इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूट’ चे प्रमुख डॅनीअल ट्विनिंग, ‘ह्यूमन राइट्स वॉच’चे संचालक केनेथ रॉथ व ‘फ्रीडम हाऊस’चे प्रमुख मायकल अब्रामोवित्झ यांना निर्बंधांचे लक्ष्य करण्यात आले आहे. वरिष्ठ सिनेटर टेड क्रूझ व मार्को रुबिओ यांच्यावर चीन कडून कारवाई होण्याची ही दुसरी वेळ आहे. ‘गेल्या महिन्यात त्यांनी माझ्यावर बंदी टाकली आणि आता निर्बंध; बहुदा चिनी सत्ताधाऱ्यांना मी आवडत नाही असेच दिसत आहे’, अशा उपरोधिक शब्दात मार्को रुबिओ यांनी चीनला टोला लगावला.

China-Americaअमेरिकेविरोधात निर्बंधांची घोषणा करीत असतानाच चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने हॉंगकॉंगमध्येही कारवाईची धार तीव्र केली आहे. हॉंगकॉंगमधील आघाडीचे दैनिक असणाऱ्या ‘ॲप्पल डेली’चे प्रमुख जिम्मी लाय यांच्यासह १० जणांना ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. जिम्मी लाय हे लोकशाही मूल्यांचे कडवे समर्थक व चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरोधातील प्रमुख टीकाकार म्हणून ओळखण्यात येतात. गेल्या दशकभरात हॉंगकॉंगमध्ये झालेल्या चीनविरोधी आंदोलनांना त्यांनी उघड पाठबळ दिले होते. लाय यांच्यासह हॉंगकॉंगमधील आघाडीचे पत्रकार व लोकशाहीवादी कार्यकर्ते ॲग्नस चोऊ तसेच विल्सन ली यांनाही चीनच्या सुरक्षायंत्रणांनी अटक केली आहे.

चिनी यंत्रणाच्या या कारवाईविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटली. अमेरिका व ब्रिटनसह संयुक्त राष्ट्रसंघाने या कारवाईवर चिंता व्यक्त केली आहे. या कारवाईने चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे हॉंगकॉंगमधील इरादे पुन्हा एकदा उघड झाले आहेत, अशी टीका अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केली. दक्षिण कोरियाची राजधानी सेउलमध्ये चीनच्या दूतावासासमोर शेकडो आंदोलकांनी निदर्शनेही केली.

leave a reply