भारताबरोबरील सीमावादाची तीव्रता वाढलेली असताना चीनकडून लष्कराच्या अधिकारात वाढ करणारा कायदा मंजूर

सीमावादाची तीव्रताबीजिंग – सीमेवरील चीनविरोधी कारवाया रोखण्यासाठी चीनने आपल्या लष्कराला विशेष अधिकार देणारा कायदा केला आहे. चीनचे सार्वभौमत्त्व आणि क्षेत्रिय अखंडतेसाठी धोकादायक ठरणार्‍या कारवाया, या विशेष अधिकारामुळे चीनचे लष्कर हाणून पाडेल, असा दावा या देशाच्या सरकारी वृत्तसंस्थेने केला आहे. भारत आणि चीनच्या एलएसीवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, चीनचा हा निर्णय भारताच्या विरोधात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

चिनी संसदेच्या स्थायी समितीने या कायद्याला मंजुरी दिली. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने याची माहिती दिली असून १ जानेवारी २०२२ पासून हा कायदा लागू होणार असल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. चीनचे सार्वभौमत्त्व आणि क्षेत्रिय अखंडता या अत्यंत पवित्र आणि उल्लंघन न करता येण्याजोग्या गोष्टी आहेत. म्हणूनच चीनच्या भूसीमा सुरक्षित करण्यासाठी हा कायदा करून चिनी लष्कराला अधिक अधिकार दिले जात आहेत, अशी माहिती सदर वृत्तसंस्थेने दिली. यामुळे सीमेवर चीनचे सार्वभौमत्त्व व अखंडतेसाठी धोकादायक कारवाया रोखता येतील, असा दावा ही वृत्तसंस्था करीत आहे.

दरम्यान, चीनचा हा कायदा म्हणजे या देशाच्या प्रचारतंत्राचा भाग असल्याचे दिसते. गेल्या काही आठवड्यांपासून एलएसीवर घुसखोरीचे प्रयत्न करून चीनचे लष्कर भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या आधी चीनने एलएसीनजिकच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात सैन्यतैनाती तसेच शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याची तैनाती केली होती. भारतानेही तोडीस तोड तैनाती करून चीनच्या या दबावतंत्राला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. यानंतर चीनच्या जवानांनी केलेले घुसखोरीचे प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडले. यानंतर चीन आपल्या लष्कराला अधिक अधिकार देत असल्याचे जाहीर करून भारतावर दडपण टाकण्याचा आणखी एक प्रयत्न करीत असल्याचे दिसते.

भारत आणि चीनमध्ये सीमा व्यवस्थापन करार झाला असून यानुसार दोन्ही देशांच्या लष्कराला एकमेकांविरोधात शस्त्र वापरण्यास मनाई करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत चीनने आपल्या लष्कराला अधिक अधिकार बहाल करून एलएसीवर शस्त्रांचा वापर करण्याची सूट दिलेली आहे का, ते स्पष्ट झालेले नाही. पण भारताच्या विरोधात चीनचे लष्कर तशी कारवाई करू शकते, असे दाखविण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात आहे. याआधीही एलएसीवरील तणावाचे गंभीर परिणाम होतील, अशा धमक्या चीनकडून दिल्या जात होत्या. पण त्याची पर्वा न करता भारतीय लष्कर व वायुसेनेने एलएसीवर वर्चस्व गाजविणार्‍या हालचाली सुरू ठेवल्या होत्या.

म्हणूनच चीन वेगवेगळ्या मार्गाने एलएसीवरील परिस्थिती चिघळू शकते, असे संकेत देत आहे. एलएसीवर प्रचंड प्रमाणात तैनाती करण्यामागेही चीनची ही योजना असल्याचे उघड झाले होते. मात्र भारतावर दडपण टाकण्यात येत असलेल्या अपयशाचे पडसाद चीनमध्ये उमटत आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ‘वेस्टर्न थिएटर कमांड’चे नवे प्रमुख म्हणून जनरल वँग हायजिआंग यांची नियुक्ती केली. भारताच्या हालचाली डोळ्यासमोर ठेवून चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी हा बदल केला, अशी चर्चा सुरू आहे.

याआधी एलएसीवर भारताविरोधात अपेक्षित यश मिळवून देऊ न शकलेल्या चिनी लष्कराच्या वेस्टर्न थिएटर कमांडच्या तीन लष्करी अधिकार्‍यांना इथून हटवावे लागले होते. यापैकी एकजण लडाखचे हवामान सहन न होऊन दगावला, तर एकजण याच कारणामुळे अत्यावस्थ असल्याचे सांगितले जाते. आता जनरल वँग हायजिआंग यांची नियुक्ती करून चीन आपल्या भारतविरोधी कारवाया तीव्र करणार असल्याचे दिसते. चिनी लष्कराचा वापर करून तिबेटी व उघूरवंशियांवर अनन्वित अत्याचार करण्याचा अनुभव जनरल वँग हायजिआंग यांच्या गाठीशी असल्याचे सांगितले जाते.

leave a reply