एलएसीसाठी नवी लष्करी वाहने रवाना करून चीनचा भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्न

बीजिंग – एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनच्या लष्करी अधिकार्‍यांमधील चर्चेची १३ वी फेरीही अपयशी ठरली. यानंतर चीनने एलएसीवर आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. लडाखच्या एलएसीबरोबरच चीनचे लष्कर अरुणाचल प्रदेशमधील एलएसीवरही आक्रमक बनल्याच्या बातम्या येत आहेत. हिवाळ्यातही आपल्या जवानांना अव्याहतपणे रसदीचा पुरवठा व्हावा, यासाठी कुठल्याही हवामानात काम करणारी नवी लष्करी वाहने चिनी लष्कराला पुरविण्यात आलेली आहे. भारताबरोबरील चर्चा अपयशी ठरल्यानंतर, आपल्या लष्कराला चीनने ही वाहने पुरवून भारताला संदेश दिल्याचा दावा या देशाच्या मुखपत्राने केला.

एलएसीसाठी नवी लष्करी वाहने रवाना करून चीनचा भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्नगेल्या वर्षी लडाखच्या एलएसीवर दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांसमोर खडे ठाकले होते. त्यावेळी भारताच्या तुलनेत चिनी लष्कराला मिळणार्‍या सोयीसुविधा कितीतरी उत्तम दर्जाच्या असल्याचे दावे चीनने केले होते. भारतीय सैन्य लडाखच्या हवामानात गारठत असताना, चीनच्या जवानांना गरम कपडे आणि गरम अन्न मिळत होते, असे दावे चीनच्या सरकारी माध्यमांनी ठोकले होते. पण प्रत्यक्षात लडाखच्या हिवाळ्यात चीनच्या लष्कराची अवस्था बिकट बनली होती. चीनने याच्या बातम्या दडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तरीही चीनचे लष्कर आपले हे अपयश लपवू शकले नाही.

या पार्श्‍वभूमीवर चीनने सर्व प्रकारच्या हवामानात चालेल अशी वाहने आपल्या लष्कराच्या ताफ्यात दिली आहेत. ही लष्करी वाहने सुमारे १.५ टन इतके वजन वाहून नेऊ शकतात व उंचावरील भागातही प्रवास करू शकतात, असे दावे चीनने केले आहेत. यामुळे दुर्गम भागात तैनात असलेल्या चिनी लष्कराच्या जवानांना रसद पुरविण्याचा प्रश्‍न सुटू शकेल, असे चिनी विश्‍लेषकांनी म्हटले आहे. भारत व चीनच्या लष्करी अधिकार्‍यांमधील लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी चर्चेची १३ वी फेरी अपयशी ठरल्यानंतर, चीनने आपल्या लष्कराला ही वाहने पुरविण्याचा निर्णय घेतला ही लक्षणीय बाब ठरते, असा दावा चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने केला.

याद्वारे एलएसीवरील तैनाती दिर्घकाळासाठी कायम ठेवण्यास तयार असल्याचा संदेश चीनने भारताला दिला आहे. मात्र या संदेशाचा चीनला अपेक्षित असलेला परिणाम भारतावर होण्याची अजिबात शक्यता नाही. चीनबरोबरचा एलएसीवरील तणाव इतक्यात निवळणार नाही, असे भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याआधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे एलएसीवर भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असून पुढच्या काळात एलएसीवरील लष्करी तसेच वायुसेनेची क्षमता अधिकाधिक वाढविण्यासाठी भारताने पावले उचलली आहेत. चीनलाही याची पुरती जाणीव झाली आहे. मात्र भारताच्या विरोधात आपण कठोर उपाययोजना करीत असल्याच्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध करीत राहणे, ही चीनची गरज बनलेली आहे. याद्वारे चीन आपण भारताविरोधात बरेच काही करीत असल्याचे भ्रामक चित्र उभे करीत असल्याचे दिसते.

leave a reply